तरुणीवर पाच जणांचा अत्याचार; आरोपी गजाआड

तरुणीवर पाच जणांचा अत्याचार; आरोपी गजाआड

Arrest

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी रात्री पोगांव पाईपलाईन येथे घडली. शांतीनगर,आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (26) हा त्याच्या 20 वर्षीय मैत्रिणीसोबत ऍक्टिवा दुचाकीने फिरण्यासाठी पोगांव पाईपलाईन येथे गेला होता. दोघांमध्ये गप्पागोष्टी उरकल्यानंतर ते दोघेही रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी येण्यासाठी निघाले असता त्यांना पाच नराधमांनी भर रस्त्यात अडवून इम्रानला गावठी कट्टा आणि चाकू दाखवून तरुणीला पाईपलाईनच्या आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बलात्कारानंतर पाचही नराधम फरार झाले.

या घटनेने भयभीत झालेला इम्रानने प्रेयसीला सोबत घेऊन तालुका पोलीस ठाणे गाठले व त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिर्के, राजू सैदाने, शिपाई गणेश आव्हाड आदींच्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

यावेळी बलात्कार झालेल्या ठिकाणी पाईपलाइनलगतच्या माती भरावावर नराधमांच्या पाऊलखूणा उमटल्या होत्या. त्या पाऊलखुणांचा शोध घेऊन पोलिसांनी आजूबाजूच्या नागरी वस्तीत आरोपींचा शोध घेतला असता येवई हद्दीतील किशोर रघुनाथ लाखात (19) याला प्रथम ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अन्य चार जणांच्या साथीने बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून गुरुनाथ गोपाल बारी (23 रा.येवई ), हर्षद हिरामण मारले (19 रा चावींद्रा ), अविनाश पुंडलिक जाधव ( 24 रा. शेलार ), गणेश पवार (20 रा. शेलार ) या पाचही नराधमांना ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या टोळक्याकडून गावठी कट्टा व धारदार चाकू जप्त केली असून या नराधमांच्या टोळीने यापूर्वीही पोगांव पाईपलाईन रोडवर प्रेमी युगूलांना गाठून बलात्काराच्या घटना केल्या असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

First Published on: January 24, 2019 4:00 AM
Exit mobile version