Coronavirus: तो एक लग्नसोहळा कल्याण-डोंबिवलीसाठी ठरतोय डोकेदुखी; रुग्णांची संख्या वाढली

Coronavirus: तो एक लग्नसोहळा कल्याण-डोंबिवलीसाठी ठरतोय डोकेदुखी; रुग्णांची संख्या वाढली

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी ५ नविन रूग्‍ण आढळून आले. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रूग्‍णसंख्‍या आता १९ (निळजे प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील ०१ रूग्‍ण धरून) झाली आहे. नवीन रूग्‍णांपैकी ०४ रूग्‍ण हे डोंबिवली पुर्व भागातील असून ०१ रूग्‍ण कल्‍याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ०३ रूग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबधीत असून ०१ रूग्‍ण कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित आहे. नवीन रूग्‍णांपैकी कल्‍याण पुर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. दरम्यान डोंबिवलीतील त्या लग्नसोहळ्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कल्‍याण शहरात प्रथम आढळलेला कोरोना बाधित रूग्‍ण आणि त्‍याचे दोन कुटुंबिय उपचारांती पुर्णपणे बरे झाले आहेत आणि त्‍यांना डिस्चार्जही देण्‍यात आला आहे. सध्‍या कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पुर्नतपासणीअंती डिस्चार्ज दिलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या आता ४ झाली आहे. सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रातील एकूण १५ कोरोनाबाधित रूग्‍ण रूग्‍णालयात उपचार घेत आहे.

डोंबिवली येथील कोरोनाग्रस्त रुग्ण हा ज्या हळदी आणि लग्न समारंभात सहभागी झाला होता, हे लग्न माजी लोकप्रतिनिधीच्या घरातले होते. त्यामुळे या लग्न समारंभात केडीएमसी महापौर आणि इतर लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाल्याचे समोर आले होते. त्याच लग्नसमारंभातील ३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ०१ रूग्‍ण कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित आहे.

या लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या केडीएमसी महापौर विनिता राणे आणि त्यांचे पती नगरसेवक विश्वनाथ राणे यांना होम क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. याच लग्न सोहळ्यात शिवसेनेच्या एका बड्या नगरसेवकाने आणि कॉंग्रेस नगरसेवकासह इतर अनेक राकारणी लोकांनी देखील हजेरी लावली होती.

२ माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक यांच्या बेजबाबदारपणामुळे जनतेवर कोरोनाच्या भितीचे सावट पसरले असून आजच्या ह्या परिस्थितीला हेच जवाबदार असल्याची टीका नागरिक करत आहेत. समाजातील या जबाबदार आजी-माजी नगरसेवकांवर पण कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या घटनेला पोलीस देखील तेवढेच जवाबदार असून पोलिसांनी हळदीच्या दिवशी अथवा लग्नाच्या दिवशीच जर हा लग्न सोहळा होण्यापासून थांबवला असता तर आज हि परिस्थिती ओढावली नसती.

First Published on: April 2, 2020 8:46 PM
Exit mobile version