चार दिवसांत पाच शिक्षकांचे कोरोनामुळे निधन

चार दिवसांत पाच शिक्षकांचे कोरोनामुळे निधन

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे, तांदुळ वाटप करणे, त्याचबरोबरच विविध लिंक भरण्यासाठी शाळांमध्ये शिक्षकांना बोलवण्यात येत आहे. त्यामुळे वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतून शिक्षकांना शाळांमध्ये येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. परिणामी चार दिवसांमध्ये पाच शिक्षकांचे निधन झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे शिक्षकांना उपस्थितीची सक्ती करू नये अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने अनेक शिक्षक विद्यार्थ्यांन ऑनलाईन शिकवत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार व ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना शाळेत बोलावू नये अशा सूचना २४ जूनच्या परिपत्रकात दिल्या आहेत. असे असताना अनेक ठिकाणी शिक्षकांना विनाकारण शाळेत बोलविण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असून कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक-शिक्षकेत्तर कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडत आहेत. पुस्तक वाटप आणि निकालाची कामे पूर्ण झाली आहेत. तरीही शिक्षकांना आठवड्यातून काही दिवस शाळेत बोलावून दिवसभर बसवून ठेवले जाते. यामुळे शिक्षकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मागील चार दिवसांत पाच शिक्षकांचे करोनामुळे निधन झाले आहे. यापूर्वीही शिक्षकांचे कोरोनाने निधन झाले आहे. तसेच अनेक शिक्षक कोरोना संक्रमित आहेत. काही संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षकांना सक्तीने शाळेत बोलवून घेत आहेत. याबाबत सरकारने लक्ष घालावे आणि शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे. अनेक शिक्षक प्रतिबंधित क्षेत्रात राहतात. असे असतानाही त्यांनाही बोलावले जात आहे. याबाबत यापूर्वीही सरकारकडे निवेदन दिले होते मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता तरी सराकरने याबाबत निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

First Published on: September 15, 2020 7:02 PM
Exit mobile version