फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडियाचा धमाका, लाखभर नोकऱ्या मिळणार!

फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडियाचा धमाका, लाखभर नोकऱ्या मिळणार!

फ्लिपकार्ट तोट्यात

दिवाळीचा सीझन म्हणजे ग्राहकांसाठी धमाल ऑफर्सचा सीजन! थेट बाजारासोबतच ऑनलाईन खरेदी-विक्रीलाही या काळाच जोर चढतो. यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन अशा ऑनलाईन खरेदीच्या वेबसाईट्स ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देखील जाहीर करत असतात. मात्र, यंदाची दिवाळी ग्राहकांसोबतच रोजगाराभिमुख तरुणांसाठीही खास असणार आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट यंदाच्या दिवाळी फेस्टिव्हलसाठी तब्बल १ लाखाहून अधिक तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या निर्माण करणार आहे. इकोनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

अशा निर्माण होणार लाखभर नोकऱ्या!

नुकतंच वॉलमार्ट या अमेरिकेतल्या ऑनलाईन मार्केटमधल्या बलाढ्य कंपनीने फ्लिपकार्ट विकत घेतली आहे. त्यानंतरचा हा पहिलाच फेस्टिव्हल सीझन असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑफर्स जारी करण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टसोबतच अॅमेझॉन इंडियानेही दरवर्षीप्रमाणे ऑफर्स दिल्या आहेत. या ऑफर्समधून दोन्ही वेबसाईटवर वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियाकडून लाखो तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या निर्माण केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वॉलमार्टमुळे फ्लिपकार्टला संजीवनी

‘गेल्या दोन वर्षांपासून फ्लिपकार्टमध्ये थोडीशी मरगळ आली होती. मात्र, आता वॉलमार्ट आल्यामुळे फ्लिपकार्ट पूर्ण जोमाने मार्केटमध्ये उतरलं आहे. मात्र अॅमेझॉनला फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी तेवढ्याच मनुष्यबळाची आवश्यकता आहे,’ अशी प्रतिक्रिया तात्पुरत्या स्वरुपाचं मनुष्यबळ पुरवणाऱ्या टीमलीजचे सहसंस्थापक रितुपर्ण चक्रवर्ती यांनी दिली आहे.

दरम्यान, काही जाणकारांच्या मते या तात्पुरत्या स्वरुपाच्या रोजगाराचा आकडा २ लाखांच्या घरात जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात फ्लिपकार्टसोबतच रोजगाराभिमुख तरुणांची दिवाळीही धडाक्यात साजरी होणार अशीच चिन्ह दिसत आहेत.

First Published on: October 29, 2018 11:41 AM
Exit mobile version