आपात्कालीन परिस्थितीसाठी जे.जे. हॉस्पिटलचा ‘माहिती पुस्तिके’चा उपक्रम

आपात्कालीन परिस्थितीसाठी जे.जे. हॉस्पिटलचा ‘माहिती पुस्तिके’चा उपक्रम

सर जे. जे. हॉस्पिटल

आपात्कालीन परिस्थितीत डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावं? एखाद्या घटनेतील रुग्णांना त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांना कसं सांभाळावं? अचानक आगीची घटना घडली, पूर, इमारत कोसळणे या अशा आपात्कालीन परिस्थितीत कसं काम करायचे? या सर्व आपात्कालीन परिस्थितींची माहिती देण्यासाठी जे. जे. हॉस्पिटल याबाबत लवकरच माहिती पुस्तिका काढणार आहे. ही माहिती पुस्तिका डॉक्टरांसह सर्वसामान्यांनाही फायदेशीर ठरणार आहे.

पूरपरिस्थितीचा विचार करुन माहिती पुस्तिका

महाराष्ट्रात सध्या पूरपरिस्थिती कायम आहे. पाणी जरी ओसरलं असलं तरी घरची परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान सरकार आणि तिथल्या नागरिकांसमोर आहे. या भागातील नागरिकांना सर्वतोपरी मदत व्हावी यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. तातडीनं वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक सरकारी आणि खासगी डॉक्टर याठिकाणी दाखल झाले आहेत. गरज पडल्यास मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीमही त्याठिकाणी जाणार. पण, यासोबत पूर आणि त्यासारखी इतर आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी काय करता येईल याबाबत जे. जे. हॉस्पिटल लवकर माहिती पुस्तिका काढणार आहे. ज्याचा फायदा डॉक्टरांसह सर्वसामान्यांनाही होणार आहे. जे. जे. हॉस्पिटलमधील ८ विभाग प्रमुखांची मंगळवारी उशिरा बैठक झाली. या बैठकीत पूरग्रस्त भागातील आजार, तिथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपलब्धता याचा आढावा घेण्यात आला.

पूरग्रस्त भागात दूषित पाण्यामुळे अनेकांना जुलाब, अतिसार, कॉलरा होण्याची भीती वर्तवली जाते आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवता कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारच्या वतीने जे. जे. हॉस्पिटलमार्फत दोन ट्रक भरून औषधांचा साठा कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याशिवाय अशी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नेमकं काय करावं याबाबत मार्गदर्शनपर एक माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागातील प्रमुखांची मदत घेतली जाईल.
– डॉ. अभिजीत जोशी, जे. जे. हॉस्पिटलमधील जनसंपर्क अधिकारी(मीडिया सेल)

हेही वाचा – जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल; तीन तासांनंतर बेस्टने केली वीज पूर्ववत 

सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त परिसरात अनेक डॉक्टर तेथील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. पण, विविध आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता हॉस्पिटलकडून तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तिथे पाठवण्याबाबत विचार करत आहोत. याबाबत नुकतीच आठ विभागांतील प्रमुखांची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यतः मेडिसीन, पीएसएम(रोगप्रतिबंधक शास्त्र), मनोविकार तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांचा समावेश होता. यात कोणकोणते आजार उद्भवू शकतात यावर काय उपाय आहेत? यावर चर्चा करण्यात आली.
– डॉ. अजय चंदनवाले, जे. जे. हॉस्पिटलमधील अधिष्ठाता
First Published on: August 14, 2019 12:58 PM
Exit mobile version