शाळांच्या देखभाल, स्वच्छतेसाठी निविदा न काढताच कंत्राट

शाळांच्या देखभाल, स्वच्छतेसाठी निविदा न काढताच कंत्राट

मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या शाळांच्या शालेय इमारतींची स्वच्छता, सुरक्षा आणि शाळांमधील विद्युत साधने, उपकरणे आदींची देखभाल व दुरुस्ती यासाठी तीन वर्षांकरता नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुनही तब्ब्ल तीनदा मुदतवाढ देत एक वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला. यासाठी तीन कंत्राटदारांना तब्बल ६४ कोटींचे काम निविदा न काढताच देण्यात आले आहे. त्यामुळे २०९.७८ कोटींचे कंत्राट आता २७३.७७ कोटींवर पोहोचले.

तरीही तीन महिन्यांच्या मुदतवाढीला मान्यता

महापालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतींसाठी स्वच्छता सुरक्षा आणि शाळांमधील विद्युतसाधने यांची देखभाल व परिसराची स्वच्छता यासाठी मागील २००९पासून खाजगी संस्थांची नेमणूक करण्यात येते. त्यानुसार शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यासाठी अनुक्रमे मेसर्स बिव्हीजी इंडिया, मेसर्स ब्रिस्क इंडिया आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या मेसर्स क्रिस्टल इंटीग्रेटेड लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली. मार्च २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी एकूण २०९ कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. परंतु त्यानंतर यासाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवणे आवश्यक असल्याने महापालिका प्रशासनाने १८ मार्च ते १७ जुलै २०१९ या तीन महिन्यांच्या कालवधीसाठी प्रथम मुदतवाढ देत एकूण १३.८६ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. तोपर्यंत ही निविदा प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असतानाही प्रशासनाने आणखी तीन महिन्यांच्या मुदतवाढीला मान्यता दिली. १८ जून ते १७ सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी १७.२७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. परंतु त्यानंतरही ही निविदा प्रक्रीया पूर्ण न करता आता १८ सप्टेंबर २०१९ ते १७ मार्च २०२० या कालावधीसाठी ३२.८४ कोटी रुपयांच्या कंत्राट खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सलग तीन वेळा मुदतवाढीला मान्यता देत तब्बल एक वर्षांचे कंत्राट काम या तिन्ही कंपनीला निविदा न काढताच देण्यात आले असून महापालिका खरेदी खात्यातील अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे आणि संगनमताने ही कामे या तिन्ही कंपनीला आंदण दिली जात आहेत.

हेही वाचा – कल्याणचे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची डेडलाइन उलटली

शहर भाग

कंत्राटदार : बी.व्ही.जी इंडिया
मूळ कंत्राट किंमत : ६५.१८ कोटी रुपये
वाढीव कंत्राटासह एकूण किंमत : ८५.०६ कोटी

पूर्व उपनगरे

कंत्राटदार : ब्रिस्क इंडिया लिमिटेड
मूळ कंत्राट किंमत : ६८.३० कोटी रुपये
वाढीव कंत्राटासह एकूण किंमत : ८९.१४ कोटी

पश्चिम उपनगरे

कंत्राटदार : क्रिस्टल इंटीग्रेटेड लिमिटेड
मूळ कंत्राट किंमत : ७६.२९ कोटी रुपये
वाढीव कंत्राटासह एकूण किंमत : ९९.५६ कोटी

First Published on: September 18, 2019 9:28 PM
Exit mobile version