CoronaVirus: हॉटेलपेक्षा परदेशातील प्रवाशांची पसंती सेव्हन हिल्सलाच

CoronaVirus: हॉटेलपेक्षा परदेशातील प्रवाशांची पसंती सेव्हन हिल्सलाच

सेव्हन हिल्समधील कोरोना उपचारांसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर ११९ कोटींचा खर्च

‘करोना’ विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील येथील अलगीकरण कक्षामध्ये (क्वारंटाईन वॉर्ड) ठेवण्यात येत आहे. मात्र, सुरुवातील या अलगीकरण केंद्रांमध्ये राहण्यास नकार देणारे परदेशी पर्यटकांसह इतरही आता बिनधास्तपणे राहू लागले आहेत. या केंद्रात राहिल्यानंतर अनेक पर्यटक आणि पाहुण्यांनी महापालिकेने निश्चित केलेल्या पंचतारांकित हॉटेल्यमध्ये राहण्याची इच्छा प्रकट केली जाते. परंतु तारांकित हॉटेल्समधील वातावरणापेक्षा सेव्हन हिल्समधील खेळीमेळीच्या वातावरणामुळे सर्वांचीच पसंती आता सेव्हन हिल्स रुग्णालयात असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयामध्ये ‘करोना’च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरु केल्यानंतर, परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना स्वतंत्र ठेवण्यासाठी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात अलगीकरण कक्षाची स्थापन करण्याची घोषणा केली. सुरुवातीपासून सेव्हन हिल्समधील कक्ष अस्वच्छता आणि गैरसोयीचे असल्याचा आरोप होत असला तरी सध्या मात्र, सर्वांना तारांकित हॉटेल्सऐवजी सेव्हन हिल्सलाच पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सेव्हन हिल्सच्या अलगीकरण कक्षामध्ये सध्या एकूण २७९ परदेशातून आलेले प्रवाशी आहेत. यासर्वांसाठी कक्षामध्ये विशेष स्वच्छता तसेच प्रत्येक कक्षात वृत्तपत्र आणि दूरवाहिनी संच बसवण्यात आले आहेत. याठिकाणी दाखल झालेल्या प्रत्येक प्रवाशांचे दोनदा स्वॅप घेतले जात आहेत. हे दोन्हीही नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आल्यास त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या अटीवर होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.

विशेष म्हणजे विदेशी पाहुण्यांसाठी महापालिकेने हॉटेल मिरॅज, हॉटेल ताज विवांटा आणि जे.डब्ल्यू मेरिएट अशा तीन तारांकित हॉटेल्समध्ये अलगीकरण कक्ष केले आहे. यासाठी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले आहेत. परंतु अनेक ब्रिटीश,आस्ट्रेलियाच्या पाहुण्यांना सुरुवातीला सेव्हनहिल्समध्ये नेण्यात आले होते. परंतु सुरुवातीला त्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांना तारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. पण तारांकित हॉटेल्समधील बंदिस्त वातावरणाच्या तुलनेत सेव्हन हिल्समध्ये मोकळे वातावरण पाहून या पाहुण्यांनी पुन्हा सेव्हन हिल्समध्ये राहण्याची तयारी दर्शवल्याचे अनुभव सध्या ऐकायला मिळत आहेत. शिवाय बाहेरील कॅटरर्सकडून जेवण, नाश्ता आदी वेळेवर पुरवले जात आहे.

आणि त्याने चक्क नोकराला सोबत ठेवण्याची केली विनंती

परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला सेव्हन हिल्समध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर, त्याने चक्क आपल्या घरुन नोकराला सोबत राहण्यासाठी बोलावून घेतले. आणि माझ्यासोबत हाही राहिल,असे त्यांनी सेव्हन हिल्समधील वैद्यकीय पथकाला कळवले. तेव्हा, त्यांनी नोकराला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे बराच काळ वाद निर्माण झाल्यानंतर अखेर नोकराला पाठवून त्याला एकट्याला राहू देण्यात आले.

First Published on: March 23, 2020 6:13 PM
Exit mobile version