झाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित

झाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित

ठाण्यात झालेले आंदोलन

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथील झाडे जळीत प्रकरणी शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर वन विभागाने बदलापूरचे आरएफओ चंद्रकांत शेळके यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे लेखी आश्वासन मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी खासदारांना दिले आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाण्यातील कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगाला झाडांची राख फासून निषेध केला.

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

खा. डॉ. शिंदे आणि शिवसैनिकांचा रुद्रावतार बघून कदम यांनी बदलापूरचे आरएफओ चंद्रकांत शेळके यांना तातडीने निलंबित केले असून उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांची आठवडाभरात चौकशी करून शासनाला अहवाल पाठवण्याचे आणि जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे लेखी आश्वासन कदम यांनी खासदारांना दिले आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना ताब्यात घेतले.

First Published on: November 19, 2018 4:52 PM
Exit mobile version