नालेसफाई कामांच्या पाहणीची भाजपाला घाई; माजी महापौरांचा टोला

नालेसफाई कामांच्या पाहणीची भाजपाला घाई; माजी महापौरांचा टोला

नालेसफाईची कामे १५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने सुरू होते. मात्र भाजपला नालेसफाई कामांची उगाच घाई झाली आहे, असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे. सध्या भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे खासदार, आमदार, माजी नगरसेवक आदी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची गेल्या आठवड्याभरापासून पाहणी करीत आहेत. या नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त करीत शेलार व भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन त्यांना नालेसफाई कामांबाबतचे फ़ोटोसह पाहणीअहवाल सादर केला.

या नालेसफाईचा दौरा करताना आ. शेलार यांनी, सत्ताधारी शिवसेनेने व पालिका प्रशासनाने नालेसफाईची जबाबदारी झटकून मुंबईकरांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. भाजपच्या या नालेसफाई दौर्याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी वरीलप्रमाणे भाजपला टोला मारणारे उत्तर दिले.

आता शिवसेनाही नालेसफाई कामांची करणार पाहणी

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बुधवारी पालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत, मुंबईतील नालेसफाई, रस्ते कामे, पालिका निवडणूक इतर विकास कामे, पावसाळापूर्व कामे यांचा
आढावा घेतला. याबाबत पत्रकारांशी बोलताना, आम्ही सध्या नगरसेवक नसलो तरी आमची जबाबदारी संपलेली नाही. आमची नाळ मुंबईकरांसोबत जोडली आहे. रस्त्यांची कामे सुरु आहेत, नाल्यांमधील गाळ काढला जात आहे. त्या कामाची पाहणी करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मात्र काही व्यक्तिगत काम असल्याने माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सदर बैठकीला येऊ शकले नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

काहीही मॅनेज होतं

वादग्रस्त विक्रांत युद्ध नौका स्मारकासाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपाबाबत उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी विचारले असता किशोरी पेडणेकर यांनी, आजकाल काहीही मॅनेज होते, असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. मात्र काहीही मॅनेज होत पण मी ‘कोर्ट ‘ असे म्हणत नसल्याचे स्पष्टीकरणही द्यायला त्या विसरल्या नाहीत.


 

First Published on: April 13, 2022 9:07 PM
Exit mobile version