रंगमंच कामगारांच्या मदतनिधीमध्ये घोटाळा? प्रशांत दामलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वाद!

रंगमंच कामगारांच्या मदतनिधीमध्ये घोटाळा? प्रशांत दामलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वाद!

पडद्यामागचे कलाकार

कोरोनाच्या काळात देशभर लॉरडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा परिणाम चित्रपट, नाटकसृष्टीवर झाला आहे. बॅक स्टेजला काम करणाऱ्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या हातातील काम गेल्यामुळे अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे गेला आहे. लॉकडाऊन जाहीर होताच अभिनेता प्रशांत दामले यांच्या निर्मीती संस्थेने काही कामगारांना मदत देऊ केली. पण आता रंगमंच कामगारांच्या याच मदतनिधीमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप रंगमंच कामगार संघटनेने केला आहे. याचवेळी रंगमंच कामगार संघटनेने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या वादग्रस्त विधानाचाही निषेध केला आहे.

काय म्हणालेले प्रशांत दामले,

प्रशांत दामले यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर दारुची दुकानं बंद असल्यामुळे कुणी पैशाचा दुरुपयोग करणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर संघटनेने आक्षेप घेतला आहे.

नाट्य समुहाने एका वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे, “प्रशांत दामले यांनी ते वक्तव्य मस्करीत केलं होतं. त्यांचा कुणालाही हिणवण्याचा हेतू नव्हता. प्रशांत दामलेंची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. सगळ्यात आधी प्रशांत दामलेंनी मदत केली होती. प्रशांत दामले यांनी लगेचच प्रत्येकी १० हजार रुपये मदत केली होती याचा विसर पडलेला दिसतोय. वाढत्या मदतनिधीतील रक्कम बघून काही जणांचे डोळे फिरले आहेत.”

काय आहे कामगार संघटनांच म्हणणं..

एकूण ७७७ कामगार आहेत. त्यातील केवळ २७५ कामगारांनाच मदत करण्यात आली आहे. या वादामुळे मराठी नाट्यसृष्टीत आता दोन गट पडले आहेत. मात्र, नाट्य समूह गटाने कुणी तरी रंगमंच कामगारांना भडकावत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व वादात ऐन लॉकडाऊच्या काळात या रंगमंच कामगारांची मात्र ओढाताण होते आहे. दिड महिन्यांपासून इंडस्ट्री ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांनी हा वाद बाजूला ठेवून मदत करण्याची विनंती केली आहे.

हे सगळं गैरसमजातून झालं आहे. आमचं नाट्य समूह ग्रुपशी बोलणं सुरु आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असं मत रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ये यांनी व्यक्त केलं आहे.


हे ही वाचा – Photos – कागदपत्रांअभावी मजुरांची पुन्हा पायपीट!


 

First Published on: May 10, 2020 8:39 PM
Exit mobile version