ईशान्य मुंबईसाठी स्वतंत्र जाहिरनामा

ईशान्य मुंबईसाठी स्वतंत्र जाहिरनामा

मनोज कोटक

आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर काय करणार या प्रश्नावर अनेक उमेदवारांची भंबेरी उडते तिथे ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी पुढील पाच वर्षांतील विकास कामांची जंत्रीच जनतेसमोर ठेवली आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे, मेट्रो, आणि रस्ते वाहतूक सुधारणा,नागरी सुविधा,महिला सक्षमीकरण आदींवर त्यांनी भर दिला. एका बाजुला कोटक यांनी स्वत:चा स्वतंत्र वचननामा प्रसिध्द केला असला तरी आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकडून अशाप्रकारचा वचननामा प्रसिध्द न केल्यामुळे कोटक यांच्या वचननाम्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेला स्वत:चा वचननामा जाहीर केला. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये प्रसिध्द केलेल्या वचननाम्यात मेट्रो ४ – वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे मेट्रो मार्ग, मेट्रो २ बी – मानखुर्द – बांद्रा – बीकेसी मेट्रो मार्ग, मेट्रो ६ विक्रोळी – जोगेश्वरी मेट्रो मार्ग आदी प्रकल्प कार्यान्वित करून कामाला कामाला गती देण्याचे आश्वासन दिले आहे. एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्याबरोबरच सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेर्‍या सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था तसेच रेल्वे फेर्‍यांची संख्या दुपटीने वाढवण्यासाठी मध्य रेल्वेवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही अत्याधुनिक सिग्नलींग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मतदार संघातील नागरी सुविधांच्या दृष्टीकोनातून ईशान्य मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे ऑडिट करतानाच भूमिगत पार्किंग सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे. शिवाय मुलुंड डम्पिंगच्या जागेवर उद्याननिर्मिती करून या भागाचे सुशोभिकरण आणि देवनार, कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नमूद केले आहे. भांडुपमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे कामाला गती देतानाच त्यासोबत कर्करोगाचेही रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून ईशान्य मुंबईतील एक रेल्वे स्थानक सर्व महिला संचालित स्वरूपात कार्यान्वित करणे,या भागातील सर्व रेल्वे स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग डिस्पेन्सर व इन्सीरेटर मशीन बसवणे तसेच महिलांसाठी राखीव खेळाचे मैदान बनवणे अशा कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र गतीशील करण्याबरोबरच शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ शक्तीस्थळ उभारले जाईल. तसेच ईशान्य मुंबईच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढविण्यासाठी विकासदूत संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी आपल्या वचननाम्यात म्हटले आहे.

First Published on: April 24, 2019 4:31 AM
Exit mobile version