रिक्षाचालकाची 14 एप्रिलला मोफत सेवा

रिक्षाचालकाची 14 एप्रिलला मोफत सेवा

Milind Sonawane

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन केले जाते. बदलापुरातील एका रिक्षाचालकानेही 14 एप्रिलला प्रवाशांना मोफत सेवा देऊन अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून, यातून मिळणारे समाधान खूप मोठे असल्याची भावना या रिक्षाचालकाने व्यक्त केली आहे.

बदलापूर पूर्वेकडील सम्राट अशोकनगर येथे राहणारे मिलिंद सोनवणे एका सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वत्र विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन होत असते. आपण असं काहीतरी करावे, असा विचार करीत असताना बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी 14 एप्रिलला प्रवाशांना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. 14 एप्रिलला सकाळी नेहमीप्रमाणे सोनवणे रिक्षा घेऊन शिरगाव येथील स्टॅण्डवर येतात आणि त्यांचा मोफत प्रवास सुरू होतो. दिवसभर प्रवासी मिळतील तसे ते शहराच्या कोणत्याही भागात सेवा देतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची ही सेवा सुरू असते. प्रवासी कुणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो त्याला मोफत सेवा देतात. दरवर्षी शेकडो प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळतो. यावर्षीही सकाळपासून मिलिंदची मोफत प्रवास सेवा सुरू असून, संध्याकाळी 4.30 वा. पर्यंत दीडशेहून अधिक प्रवाशांनी त्यांच्या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून मी हा उपक्रम सुरू केला आहे. वर्षभर आपण व्यवसाय म्हणून रिक्षा चालवतो, पण एक दिवस सेवा म्हणून रिक्षा चालवताना मिळणारे समाधान काही औरच असते. यापुढेही मी हा उपक्रम सुरू ठेवणार आहे.

First Published on: April 15, 2019 4:12 AM
Exit mobile version