फळांच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ

फळांच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ

प्रातिनिधिक फोटो

गणेशोत्सवात सजावटी साहित्याबरोबर अधिक मागणी असते ती फळांना. मागणी जास्त मात्र पुरवठा कमी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्यामुळे यंदा फळांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात एपीएमसी बाजारातील फळांची मागणी दुपटीने वाढली आहे. त्यामुळे सफरचंद, मोसंबी, डाळींब या फळांच्या किमतीत वाढ झाली आहे.

एपीएमसी बाजारात सध्या फळांच्या दररोज २५० ते ३०० गाड्या दाखल होत आहेत. तसेच बाजारात सफरचंद, डाळींब,सीताफळ, मोसंबी, संत्री या देशी फळांचा हंगाम सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात दररोज २५ ते 30 गाड्या विक्री होत आहेत. सफरचंद, डाळींब, मोसंबी ही फळे अधिक काळ टिकणारी असल्याने यांना अधिक मागणी आहे. बाजारात शिमला येथील सफरचंदच्या १०० गाड्या दाखल झाल्या असून घाऊक बाजारात सफरचंदाच्या दरात १०० ते २०० रुपयांची वाढ झालेली आहे.

घाऊक बाजारात सफरचंदला २५-३० किलोला आधी १८०० ते २२०० रुपये बाजारभाव होता ते आता १८०० ते २५०० रुपयांवर गेला आहे. सीताफळ आणि डाळिंबाच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली येथून डाळिंबाच्या ५० गाड्यांची आवक असून घाऊक बाजारात डाळिंब ८० रु. प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात १२० ते १८० रु. किलोने विकली जात आहेत. पुणे, नगर जिल्ह्यातून दाखल सीताफळांच्या ३० गाड्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. सीताफळ घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० ते १०० रुपयांना विकली जात आहेत. नागपूर येथून १५-२० गाड्या मोसंबी बाजारात दाखल झाली आहेत. ही मोसंबी ८ डझनला ८०० ते १००० रुपयांना विकली जात आहेत.

First Published on: September 16, 2018 3:00 AM
Exit mobile version