कर्जबुडव्या विजय मल्ल्याला कोणत्याही क्षणी मुंबईत आणले जाणार

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला कोणत्याही क्षणी मुंबईत आणले जाणार

कर्जबुडव्या विजय मल्ल्या

हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला कोणत्याही क्षण आता मुंबईत आणले जाणार आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषन आणि ईडीचे अधिकारी बुधवारी रात्री मल्ल्याला घेऊन येणार आहेत. सर्वप्रथम विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याला सीबीआयच्या कार्यालयात काही काळ ठेवले जाईल. त्यानंतर उद्या त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. जर गुरुवारी दुपारी मल्ल्याला घेऊन विमान परतले तर त्याला थेट कोर्टात सादर केले जाणार आहे. तिथे सीबीआय त्याच्या कोठडीची मागणी करेल. त्यानंतर ईडीही त्याला कोठडीत ठेवण्याची परवानगी मागेल.

विजय मल्ल्याने १७ बँकाचे मिळून ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. मल्या २ मार्च २०१६ रोजी भारतातून पळून गेला होता. त्याने ब्रिटनमध्ये आसरा घेतला होता. त्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी मल्ल्याला भारतात आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली. युकेच्या कोर्टात न्यायालयीन लढाई लढली. त्यानंतर कुठे १४ मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब झाले होते.

ऑगस्ट २०१८ साली युकेतील कोर्टाने मल्ला भारताच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला कोणत्या ठिकाणी तुरुंगात ठेवणार असा प्रश्न भारतीय तपास यंत्रणांना विचारला होता. मल्ल्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ज्या बॅरेकमध्ये ठेवले जाणार आहे, त्याचा व्हिडिओ देखील तपास यंत्रणांनी युके कोर्टाला सादर केला होता. तसेच तपास यंत्रणांनी युके कोर्टाला असे देखील सांगितले की, प्रत्यार्पणानंतर मल्ल्याला आर्थर रोडमधील दोन मजली अतिसुरक्षित बॅरेकमध्ये कैद ठेवण्यात येणार आहे.

आर्थर रोड तुरुंग हे अंडरवर्ल्डमधील कुप्रसिद्ध नावांसाठी प्रसिद्ध आहे. २६/११ च्या हल्ल्यातील एकमेव पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब, अबु सालेम, छोटा राजन, मुस्तफा डोसा, पीटर मुखर्जी आणि पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी विपुल अंबानीला देखील आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात आलेले आहे.

First Published on: June 3, 2020 10:58 PM
Exit mobile version