सावधान! नाकातील बुरशी बेतू शकते तुमच्या जीवावर

सावधान! नाकातील बुरशी बेतू शकते तुमच्या जीवावर

नाकातील बुरशी डायबिटीक रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे.

प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या नाकपुड्यांमध्ये बुरशी (फंगल) असते. पण, ही बुरशी सर्वात जास्त डायबिटिक रुग्णांसाठी धोकादायक ठरते. सध्या नाक-कान-घसा या अवयवांच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकीच डायबिटिक रुग्णांमध्ये होणाऱ्या या समस्यांचं रुपांतर कदाचित जीव घेणं ठरु शकतं. नाकाच्या आतील त्वचेचं वातावरण बुरशी वाढण्यासाठी पूरक असते. त्यामुळे ही बुरशी नाक आणि त्याच्या सभोवतालच्या अवयवांमध्ये पसरण्यास सुरूवात होते. अनेकदा हा संसर्ग नाक, डोळा आणि मेंदूपर्यंत पसरतो. त्यातून ज्या रुग्णांना डायबिटीस असतो किंवा दिर्घकाळापर्यंत स्टेरॉईड्स घेत असतील अशांना फंगल सायनूसायटिस म्हणजेच फंगलचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग नाकापासून अनेक अवयवांमध्ये पसरला तर व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

जे. जे. रुग्णालयात २० रुग्णांवर शस्त्रक्रिया

सरकारी रुग्णालयांपैकी सर्वात मोठ्या जे.जे रुग्णालयात २०१८ ते चालू वर्षांपर्यत एकूण २० रुग्णांवर यासाठीची शस्त्रक्रिया केली गेली आहे. ज्या रुग्णांना डायबिटीस असतो त्या रुग्णांना हळूहळू या बुरशीचा संसर्ग होऊन ती मेंदूपर्यंत पसरते. शिवाय, या वेगाने पसरलेल्या बुरशीमुळे रुग्णांचा डायबिटीसही नियंत्रणात राहत नाही.

सर्व सामान्यांमध्ये नाकात ही बुरशी असतेच. पण, ही बुरशी नाकात मोठ्या प्रमाणात राहून पसरली की त्यामुळे अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याची लक्षणं ही दिसून येतात, जसे की नाक वाहणे, चेहऱ्यात सूज जाणवून तो दुखणे, डोळे उघडायला त्रास होणे, नाकाच्या नसा दुखणे. या सर्व लक्षणांमध्ये ही बुरशी सहज मेंदूच्या कवटीच्या आत पसरते. त्यामुळे अनेकदा रुग्णांना तात्काळ शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. Endoscopic maxillectomy (एंडोस्कोपी मॅक्सीलॅक्टोमी) स्वरूपात तातडीची शस्त्रक्रिया केली जाते. पण, जर या शस्त्रक्रियेला किंवा उपचारांना उशीर झाला तर ते त्या रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. असे दिवसाला किमान ३ रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. शिवाय, त्यांचा डायबिटीस ही नियंत्रणात येत नाही त्यामुळे ती बुरशीही नियंत्रणात येत नाही. ही एक सायकल होते. असे गेल्यावर्षी ते आतापर्यंत एकूण २० प्रकरणं समोर आली असून त्यांच्यावर किमान १-१ महिना उपचार केले जातात. पण, या आजाराविषयी तितकीशी जागृती नसल्याकारणाने आजही लोकं अंगावर हा आजार काढतात.
– डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय
First Published on: February 16, 2019 6:00 AM
Exit mobile version