एसटी महामंडळाविरोधात दिव्यांगामध्ये रोष

एसटी महामंडळाविरोधात  दिव्यांगामध्ये रोष

मुंबई:- राज्य परिवहन महामंडळाची आरामदायी बस असलेल्या शिवशाहीमध्ये आमदार, माजी आमदारांना नि:शुल्क प्रवास, ज्येष्ठ नागरिक, पारपत्रित पत्रकारांना सूट दिली. मात्र अंध व दिव्यांगाना कोणतीही सवलत दिलेली नाही. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या धोरणाबाबत राज्यातील दिव्यांग प्रवाशांमध्ये तीव्र रोष आहेत. शिवशाहीत सवलत मिळावी यासाठी २३ लाख दिव्यांग परिहवन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शिवशाहीचे तिकिट सामान्य बसच्या तुलनेत 100 रुपये अधिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना शिवशाहीचा प्रवास परवडत नव्हता. त्यामुळे ते शिवशाहीने प्रवास करणे टाळत होते. ही बाब लक्षात घेत परिवहन मंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीमध्ये सवलत दिली. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी सवलत देण्याचे काम समाज कल्याण विभागाचे असल्याचे सांगत हात झटकले. शिवशाही आणि शिवनेरीमध्ये दिव्यांगाना ७५ टक्के सवलत देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांपासून परिवहन मंत्र्यापयर्ंंत सर्वांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शिवशाही आणि शिवनेरी बसमध्ये दिव्यांगांना ७५ टक्के सवलत मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही सतत मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याबरोबर पत्रव्यवहार करत आहेत. आमच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थानावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी सांगितले.

‘शिवशाही’मध्ये आमदार, माजी आमदारांना जेष्ठ नागरिक तसेच पत्रकारांना सवलती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील अपंगांना सवलती का दिली गेली नाहीत. महाराष्ट्रमध्ये दिव्यांगांवर परिवहन मंत्र्यांच्या काय राग आहेत. हे आम्हाला माहिती नाही. परिवहन मंत्र्यांनी दिव्यांगांना शिवशाही आणि शिवनेरीमध्ये ७५ टक्के सवलत दिली नाही. तर आम्ही परिवहन मंत्र्याविरोधात रस्त्यावर उतरू.
– प्रसाद साळवी, राष्ट्रीय अध्यक्ष, दिव्यांग सेना

First Published on: October 20, 2018 1:11 AM
Exit mobile version