मुंबईत गणेश मूर्तिकारांच्या मंडपांना अखेर परवानगी!

मुंबईत गणेश मूर्तिकारांच्या मंडपांना अखेर परवानगी!

गणेशोत्सव अवघ्या सव्वा महिन्यांवर आलेला असताना अखेर गुरुवारी गणेश चित्रशाळांच्या मंडपांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु मागील वर्षी ज्या मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी दिली होती, त्याच आधारे यंदा त्यांच्या अर्जाची छाननी न करता त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांसमोरील मंडपांचे विघ्न यंदा दूर झाले असून त्याबरोबरच मुंबईत तयार मूर्ती आणून त्या विक्रीसाठी ठेवणाऱ्या वितरकांना यंदा कोणत्याही प्रकारे मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, रंगकामाशिवाय मूर्ती आणून आपल्या चित्रशाळेत रंगकाम करणाऱ्यांना ही परवानगी दिली जाईल. मात्र, अन्यत्र ठिकाणांहून थेट तयार केलेल्या मूर्तींची विक्री करता येणार नाही, असे बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाने स्पष्ट केले आहे.

गणेश मूर्तीकारांना दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंडप उभारण्यास परवानगी दिली जाते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने महापालिकेने मूर्तिकारांच्या चित्रशाळांना परवानगी दिली नव्हती. परिणामी त्यांना मूर्ती बनवण्याचे काम हाती घेता येत नव्हते. याबाबत मूर्तिकार संघाने इशारे दिल्यानंतर ७ जुलै २०२० रोजी मूर्तिकारांच्या मंडपांना निश्चित शुल्क आकारुन परवानगी देण्याची कार्यवाही सुरु झाली आणि ८ जुलै रोजी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे ९ जुलैपासून मूर्तिकारांना ३ हजार रुपये अनामत रक्कम आणि अडीच हजार रुपये भाडे आकारुन ही परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु झाली. यासाठी एप्रिल महिन्यात बहुसंख्य मूर्तिकारांनी महापालिकेकडे अर्ज केले होते.

मात्र,प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये मागील वर्षी ज्या मूर्तिकारांना परवानगी दिली आहे, अशा मूर्तिकारांचे अर्ज यावर्षी स्थानिक तसेच वाहतूक पोलिसांकडे न पाठवता मागील वर्षीची पोलीस परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांनी छाननी करून त्यांना परवानगी देण्यात यावी. तसेच नव्याने व प्रथमच अर्ज करणाऱ्या मूर्तिकारांच्या अर्जांची छाननी पूर्वीप्रमाणेच स्थानिक व वाहतूक पोलिस व विभाग कार्यालयामार्फत करण्यात यावी,असे निर्देश महापालिका परिमंडळ दोनचे उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी दिले आहेत. विभाग कार्यालयांनी पारंपारिक मूर्तिकारांनाच परवानगी द्यावी व अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रीसाठी मंडप उभारण्यासाठी परवानगी देऊ नये, असेही निर्देश या परिपत्रकाद्वारे दिले आहे.

बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी याबाबत बोलताना, महापालिका प्रशासनाने संघाची मागणी विचारात घेता उशिरा का होईना मंडप परवानगीचे दरवाजे उघडले. मागील वर्षीच्या आधारे ही परवानगी दिली जाणार असल्याने यंदा अडचण येणार नसली तरी ४० दिवसांमध्ये गणेश मूर्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा बनवायच्या हाही प्रश्न मूर्तिकारांपुढे आहे. अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रीसाठी आणून मंडप उभारण्यास यंदा परवानगी दिली जाणार नाही असे निर्देश महापालिकेने दिलेले आहेत. हे योग्यच आहेत. परंतु एवढ्या कमी दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवणे हे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे गणपतीचा रंगकाम न केलेल्या कोऱ्या मूर्ती आणून जे मूर्तिकार त्या रंगवून विक्रीला ठेवतील त्यांना परवानगी दिली जाईल. अर्थात हे संघाचे सदस्य असतील तरच ही परवानगी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंडळांना शुक्रवारपासून परवानगी सुरु

गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव साजरा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांना परवानगी देण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली. गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पध्दतीने ही परवानगी दिली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना ही परवानगी १०० रुपयांच्या नाममात्र शुल्काच्या आधारे दिली जाते. महापालिका उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी या ऑनलाईन परवानगीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु झाली असून प्रत्येक मंडळांना प्रतिज्ञापत्र कसे भरावे आणि उत्सव साजरा करताना कोणत्या अटी असतील याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 10, 2020 6:51 PM
Exit mobile version