गणेशमूर्तींची उंची वाढविण्यासाठी गणेशमंडळे आग्रही

गणेशमूर्तींची उंची वाढविण्यासाठी गणेशमंडळे आग्रही

गणेशमूर्तींची उंची वाढविण्यासाठी गणेशमंडळे आग्रही

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. असे असले तरी सार्वजनिक गणेशमंडळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार आहेत; मात्र मुंबईतील गणेशोत्सवाची शान असलेल्या गणेशमूर्तींची उंची चार फुटांवरून नेहमीप्रमाणे १५ फुटांपेक्षाही जास्त वाढवून देण्यात यावी, अशी आग्रही मागणी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. यावेळी, गणेश मूर्तिकारांनी त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी लावून धरली.

गणेशमंडळ, मूर्तिकार, समन्वय समिती यांच्या समस्या, मागण्या यांबाबत लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत करण्यात येईल. तसेच, लवकरच त्यांच्यासोबत याबाबत एक महत्वाची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित गणेशमंडळांना देण्यात आले आहे, अशी माहिती ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.

दादर येथील शिवसेना भवनमध्ये बुधवारी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (शहर व उपनगरे) यांच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या समवेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, नेते अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ऍड. नरेश दहीबावकर, विनोद घोसाळकर, शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, पांडुरंग सकपाळ व राजेंद्र राऊत आदी मान्यवरांसह प्रसिध्द लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ व अन्य मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जरी कोरोनाचे वातावरण असले तरी गतवर्षी आम्ही सरकारचे ऐकले व नियमांचेही पालन केले होते ; मात्र यंदा कोरोनाचे वातावरण कमी झाल्याने नियमांचे पालन करून आम्हाला सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची उंची ४ फुटांवरून वाढवून नेहमीप्रमाणे १५ – २० फुटांपर्यंत वाढवून देण्यात यावी, अशी आग्रही मागणी लावून धरली. तसेच, मूर्तिकारांनी मुंबई बाहेरून तयार गणेशमूर्ती आणून त्याची विक्री करणाऱ्यांना चाप लावण्याची मागणी केली. यावेळी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून संबंधितांची लवकरच एक बैठक घेण्यात येऊन तोडगा काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. त्याचप्रमाणे, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सेवासुविधा देण्यात येतील. मात्र गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व नियमांचे पालन करावे आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा , असे आवाहन गणेशमंडळांना केले.
याप्रसंगी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ऍड. नरेश दहीबावकर यांनी, गणेशमंडळाच्या समस्या मांडून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच, सरकार व महापालिका यांनी , गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सेवासुविधा बहाल कराव्यात, अशी मागणी केली.

 

First Published on: July 8, 2021 3:22 PM
Exit mobile version