गणेशोत्सव मंडळांना चोरांची धास्ती

गणेशोत्सव मंडळांना चोरांची धास्ती

मुंबईतील गणेशोत्सवास सध्या चोरींच्या घटनांचे ग्रहण लागले आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये रात्रीच्या वेळेस चोरीच्या घटना समोर आल्या असून यामुळे या मंडळांची डोकेदुखी वाढली आहे. वाढत्या चोरींची तक्रारी मात्र पोलिसांकडे करण्यात आल्या नसल्याचे समोर आले असून मंडळांची अधिकृत नोंदणी नसल्यामुळेच आपल्यावरच कारवाई होईल, या भितीपोटी मंडळांनी तक्रार केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. या चोर्‍यांचा फटका मुंबईतील अनेक नावाजलेल्या मंडळांना देखील बसला आहे.

मुंबईतील अनेक मंडळांमध्ये रात्रीच्या वेळेस चोरी होत असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील एका प्रसिद्ध मंडळात दोन दिवसांपूर्वी झोपलेल्या कार्यकर्त्यांच्या खिशातून मोबाईल चोरीला नेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंडळाने बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरी समोर देखील आली आहे. तर दुसर्‍या एका घटनेत एका चोरट्याकडून बाप्पाला घालण्यात आलेल्या नोटांच्या हारातून काही पैसे लंपास करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबरोबरच वडाळा येथील एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

तक्रार का नाही ?

चोर्‍यांमुळे मंडळांमध्ये धास्ती असली तरी यासंदर्भात तक्रार केली जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील काही मंडळांनी नोंदणी केली नसल्याने, आपल्यावरच कारवाई होईल, या भितीने तक्रार करण्यास टाळाटाळ केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मंडळाची बदनामी टाळण्यासाठी अनेकांनी तक्रार न करण्यास प्राधान्य दिल्याचे काही कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

First Published on: September 11, 2019 4:51 AM
Exit mobile version