गणेशोत्सवादरम्यान मिळणार क्षयरोगाचे धडे, डॉक्टरांचा पुढाकार

गणेशोत्सवादरम्यान मिळणार क्षयरोगाचे धडे, डॉक्टरांचा पुढाकार

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सर्वत्र बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहेत. आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांनी चलचित्रांतून अनेक वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी काही मंडळांमध्ये क्षयरोगाबाबतचे धडे देण्यात येणार आहेत. क्षयरोगावर काम करणारे डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट देखील या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

क्षयरोगमुक्त करण्याचं मोदींच स्वप्न

एमडीआर क्षयरुग्णांची मुंबईला जागतिक राजधानी समजली जाते. मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात जवळपास ४५ हजार एवढी क्षयरुग्णांची नोंद आहे. येत्या २०२० पर्यंत मुंबईला क्षयरोगमुक्त करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आहे. त्यानुसार सर्व डॉक्टर्सही कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर टीबीवर काम करणारे डॉक्टर्स यंदा वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन जनजागृतीवर प्रबोधन करणार आहेत. मुंबईत क्षयरोगाला नियंत्रण घालता यावं म्हणून गणेशोत्सवाच्या मंडपांचा वापर करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते, चॅरिटेबल संस्था आणि क्षयरोगतज्ज्ञ पुढे सरसावले आहेत.

या उपक्रमात मंडळाच्या कार्यकारी समितीला पत्रव्यवहार करुन अशा पद्धतीचा जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, असं डॉ. शिवडी टीबी रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र ननावरे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

या विषयांवर करणार जनजागृती

या उपक्रमात क्षयरोग होऊ नये आणि क्षयरोग झाला की काय करावं? काय काळजी घेतली पाहिजे? शिवाय, प्रतिबंध सरकारच्या काय योजना आहेत? अनुदानासाठी काय केलं पाहिजे? घरातील एखाद्याला टीबी आजार झाला की काय करायचं? गरोदर स्त्री किंवा किडनी फेल झालेल्या रुग्णांना झाला तर काय केलं पाहिजे? लहान मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे? एमडीआर रुग्णांना काय ट्रिटमेंट दिली पाहिजे? या आणि अशा प्रश्नांबाबत लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

या गणेशोत्सव मंडळांत राबवणार उपक्रम

या उपक्रमासाठी काही डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते रोहित बोऱ्हाडे तसेच, पसायदान चॅरिटेबल हॉस्पिटल आणि फार्मासिस्टचे ग्रुप एकत्र येऊन काम करत आहेत. त्यानुसार, कुर्ल्याच्या कमानी त्याचसोबत घाटकोपर आणि असल्फा या परिसरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये बॅनर्स, पोस्टर्स लावून जनजागृतीचा प्रयत्न केला जाणार आहे. अगदी सोप्या भाषेत जनजागृती केली जाणार आहे. शिवाय, यासाठी आम्हाला मंडळांनी ही सपोर्ट करण्याची गरज आहे.  – डॉ. राजेंद्र ननावरे, माजी अधिष्ठाता, शिवडी टीबी रुग्णालय

First Published on: September 7, 2018 6:23 PM
Exit mobile version