डीजे, डॉल्बीला मुंबई हायकोर्टचा दणका

डीजे, डॉल्बीला मुंबई हायकोर्टचा दणका

(फोटो प्रातिनिधिक आहे)

गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया म्हणत गुरुवारी राज्यभरात ‘बाप्पा’ विराजमान झाले. संपूर्ण देशभरात उत्साह आणि गणेशोत्सवाची धामधूम देखील पाहायला मिळाली. मात्र आज मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडणार आहे. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायांचे आज दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. साधारणतः दुपारनंतर बाप्पाची आरती करून भाविक गणपती विसर्जनाची मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देतात. काही ठिकाणी डीजे आणि डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र यावर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्यात आली असल्याने यंदा विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या जागी पारंपारिक वाद्यांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

डीजे, डॉल्बीला हायकोर्टची बंदी

गणेशोत्सवात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भक्त डीजे आणि डॉल्बीच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देतात. मात्र यंदा डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. दरवर्षी सण ये जात असतात, पण या उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही, असे हायकोर्टाने सुनावले आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जनात डीजे, डॉल्बीचा गोंगाट सहन करावा लागणार नाही.

डॉल्बी साउंड सिस्टमला तूर्तास नकार

गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या आवाजाने डीजे लावण्यात येतात. यामुळे ध्वनि प्रदूषण देखील होते. मात्र आता याला आळा घालण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यंदा डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमला मुंबई हायकोर्टाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साउंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक कारणामुळे याप्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: September 14, 2018 3:36 PM
Exit mobile version