घ्या! समुद्राचं मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट, १९५ टन कचरा फेकला बाहेर!

घ्या! समुद्राचं मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट, १९५ टन कचरा फेकला बाहेर!

भरतीनंतर मरीन ड्राईव्हवरचं 'कचरा'मय चित्र! (फोटो-संदीप टक्के)

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत निघणारा कचरा, सांडपाणी आणि अगदी जे नको ते सर्व काही मुंबईकर, महानगर पालिका समुद्रात टाकत गेले. मग त्याचा कोणताही पुढचा-मागचा विचार केला गेला नाही. पण आता मात्र मुंबईकरांना आणि पर्यायाने मुंबई महानगर पालिकेला हा विचार करावा लागणार आहे. कारण, समुद्रही आतापर्यंतच्या त्रासाचं उट्ट काढायला सज्ज झाला आहे. आत्तापर्यंत मुंबईकरांनी समुद्रात टाकलेल्या घाणीची परतफेडच मुंबईच्या समुद्रानं करायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात मुंबईचे समुद्र किनारे जर पाहिले, तर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहाणार नाही. एकीकडे मुंबईकर या कालावधीमध्ये समुद्रातून उसळणाऱ्या उंच लाटांची अनुभूती घेत असतानाच, दुसरीकडे समुद्र मात्र मुंबईकरांनी आत्तापर्यंत समुद्रात फेकलेल्या कचऱ्याचं रिटर्न गिफ्ट मुंबईकरांना देण्याची तयारी करत होता. याचाच दाखला म्हणजे रविवारी एकाच दिवसात भरतीमध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर परत आलेला तब्बल १९५ टन कचरा!

जुहू बीचवर साचला सर्वाधिक कचरा (फोटो-संदीप टक्के)

मुंबईकरांचाच कचरा केला साभार परत!

भरतीदरम्यान समुद्रातला काही कचरा किनाऱ्यावर वाहून येतो हे चित्र तसं फारसं नवीन नाही. मात्र, रविवारचं चित्र काही औरच होतं! रविवारी मुंबईच्या समुद्रानं तब्बल १९५ टन कचरा मुंबईला साभार परत केला आहे. दुपारी १ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास भरतीनंतर मुंबईतील जवळपास सर्वच समुद्र किनाऱ्यांवर हा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईचे सर्व किनारे पालथे घालत साचलेला कचरा स्वच्छ केला आहे. आणि तोही तब्बल १९५ टन!

समुद्राने फेकलेला कचरा गोळा करताना महापालिका कर्मचारी (फोटो-संदीप टक्के)

सर्वच किनाऱ्यांवर कचऱ्याचा खच!

दादर आणि माहीम समुद्र किनारा परिसरातून तब्बल ९० मेट्रिक टन इतका कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी जमा केला आहे. या कामात जी उत्तर विभागाच्या ४० कर्मचाऱ्यांनी कसून मेहनत घेत संपूर्ण किनारी भाग पिंजून काढला. मरीन लाईन्स परीसराचा, तसेच चर्नी चौपाटी परिसराचा समावेश असलेल्या ए आणि सी विभागातही मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला. ए विभागातील २२ कर्मचाऱ्यांनी ३.५ मेट्रिक टन कचरा जमा केला. तर सी विभागातील ३५ कर्मचाऱ्यांनी ९ मेट्रिक टन इतका कचरा जमा केला. याशिवाय जुहू बीच परिसरात ७५ टन इतका कचरा गोळा करण्यात आला. तर वर्सोवा बीचवरून १८ टन इतका कचरा जमा करण्यात आला आहे. याठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होतं, अशी माहिती आहे.

आपण कधी धडा घेणार? (फोटो-संदीप टक्के)

जुहू बीचवर सर्वाधिक कचरा

कचऱ्याचं रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मुंबईकर आणि इतर पर्यटकांप्रमाणेच मुंबईच्या समुद्रानेही जुहू बीचलाच सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून आलं. मुंबईभर साचलेल्या १९५ टन कचऱ्यापैकी जवळपास ७५ टन म्हणजेच सर्वाधिक कचरा एकट्या जुहू किनाऱ्यावर साचला. महापालिका कर्मचाऱ्यांनीही हा कचरा हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत हा कचरा हटवण्यासाठीचे काम सुरू होते.

कचरा किनारपट्टी ओलांडून थेट रस्त्यांवरही येत आहे. मात्र, भरतीची वेळ संध्याकाळची म्हणजेच वाहनांच्या गर्दीची नसल्यामुळे त्यातल्या त्यात ही बाब मुंबईकरांसाठी चांगली आहे.

प्रदीप पाताडे, पर्यावरण प्रेमी

रिटर्न गिफ्टमध्ये प्लास्टिक, थर्माकॉल आणि चप्पलही!

समुद्राने परत फेकलेल्या कचऱ्यात सर्वाधिक प्लास्टिक आणि थर्माकॉल तसेच तरंगणाऱ्या गोष्टींमध्ये चप्पल (स्लीपर) यासारख्या गोष्टी आढळल्या आहेत. मुंबईतल्या बऱ्याचशा नाले आणि खाड्यांमधून समुद्रात कचरा टाकला जातो. एरवी हा कचरा समुद्राच्या पोटात साचत राहातो. मात्र, मॉन्सूनमध्ये समुद्र खवळला की हाच साचलेला कचरा समुद्र मुंबईला सव्याज परत करतो. त्यातच भरतीच्या वेळी कचऱ्याचं प्रमाण अधिकच वाढत जातं. विशेष म्हणजे, हा कचरा फक्त किनारी भागापुरता मर्यादित न राहाता तो थेट रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीसाठीही अडचणीचा ठरत आहे.

येत्या काळात जर अशाच प्रकारे मुंबई समुद्राच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा सोडत राहिली, तर कदाचित भविष्यात किनाऱ्यांवर आणि रस्त्यांवर येणारा हाच कचरा थेट आपल्या घरापर्यंत आणि घरांमध्येही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांनी वेळीच सावध होण्याची तातडीची गरजच समुद्राच्या या रिटर्न गिफ्टमधून अधोरेखित झाली आहे.

First Published on: July 15, 2018 8:11 PM
Exit mobile version