शरद पवार आणि गौतम अदानी यांची सिल्व्हर ओकवर भेट, चर्चांना उधाण

शरद पवार आणि गौतम अदानी यांची सिल्व्हर ओकवर भेट, चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यात आज सकाळी १० च्या सुमारास सिल्व्हर ओकवर तब्बल दोन तास चर्चा झाली. बंददाराआड झालेल्या या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असून राजकीय वर्तुळात मात्र उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र अजितदादांनी आणि शरद पवारांनी या फक्त चर्चा असल्याचे सांगत सगळे दावे खोडून काढले. हे एकीकडे सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते अजित दादांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामुळे राष्ट्रवादीत नक्की चाललयं काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्याच दरम्यान आज सकाळी गौतम अदानी यांनी थेट सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच गौतम अदानींवरील हिंडेनबर्गच्या अहवालावर शरद पवार यांनी अदाणींचे समर्थन केले होते. तसेच देशात अदानी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे प्रश्न आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेही नाही. मग त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असे प्रश्नचिन्हही शरद पवार यांनी हिंडेनबर्गच्या दाव्यावर उभारले आहे. त्यानंतर आता थेट अदानींनी पवार यांची भेट घेतल्याने पडद्यामागे नक्की काय शिजतयं यावर जोरदार चर्चाही रंगल्या आहेत.

First Published on: April 20, 2023 1:33 PM
Exit mobile version