कुर्ल्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

कुर्ल्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

कुर्ल्यात दोन बसमध्ये अपघात

कुर्लामध्ये बेस्टच्या दोन बसला अपघात झालाय. या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. कुर्ला रेल्वे स्टेशनबाहेरील बस डेपोमध्ये वांद्र्याला जाणाऱ्या ३२० क्रमांच्या दोन बसमध्ये हा अपघात झाला आहे.

दोन बसमध्ये चिरडली तरुणी 

कुर्ला बस डेपोमध्ये बेस्टच्या ३२० क्रमांकाच्या दोन बस एकामागोमाग उभ्या होत्या. त्यामधील एक बस मागे घेत असताना मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला ही बस धडकली. या दोन्ही बसच्या मधून जात असताना एक तरुणी चिरडली गेली. अमरिन शेख असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिला जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

मृत अमरिन एचडीएफसी बँकेत होती कामाला

अमरिन शेख ही तरुणी मालाड येथे रहाणारी आहे. एचडीएफसी बँकेत ती काम करत होती. बँकेच्या कामासाठी जात असताना तिचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी ३२० बस क्रमांकाच्या दोन्ही बस ड्राईव्हरला कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांची चौकशी सुरु आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

गेल्या २४ तासात चार अपघात

मुंबईसह नवी मुंबईमध्ये गेल्या २४ तासामध्ये चार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ठाण्याच्या सॅटीस पुलावर गुरुवारी दुपारी एसटी बसला अपघात झाला. या अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. तर सानपाड्यामध्ये गुरुवार रात्री साडेअकरा वाजता शिवनेरी बसला अपघात झाला. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. तर मुंबईतील धारावी येथे गुरुवासी सायंकाळी कार अपघात झाला. यामध्ये ८ जण जखमी झाले. ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाला. तर आज सकाळी कुर्ल्यामध्ये दोन बसमध्ये अपघात झाला. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला

First Published on: June 22, 2018 3:55 PM
Exit mobile version