‘आधी पाणी द्या, नंतर मतं मागा’; डोंबिवलीत एका सोसायटीने लावला फलक

‘आधी पाणी द्या, नंतर मतं मागा’; डोंबिवलीत एका सोसायटीने लावला फलक

मुंबईला लागूनच असलेल्या शहरातील एका सोसायटीला पिण्याच्या टँकरवरच तहान भागवावी लागत आहे असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण डोंबिवलीसारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत शहरात असा प्रकार घडत आहे. तब्बल १६ वर्षे या सोसायटीला महापालिकेचे पाणी मिळत नाही, पण महापालिकेकडून बिलं पाठवली जात आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सोसायटीतील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ‘आधी पाणी द्या, नंतर मतं मागा’, असा आशयाचा फलकही सोसायटीने इमारतीच्या दर्शनी भागात लावून सर्वच राजकीय पक्षांना चपराक लगावली आहे. त्यामुळे या फलकाची चर्चा शहरात रंगली आहे.

हेही वाचा – मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंचा एल्गार!

१६ वर्षांपासून पालिकेचा पाणी पुरवठा नाही

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटीने हा फलक लावला आहे. या इमारतीत १२५ कुटुंबं राहतात. मात्र १६ वर्षांपासून पालिकेचे पाणीच इमारतीत येत नाही. सोसायटीतील रहिवाशांनी महापालिका व लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. पण रहिवाशांच्या तक्रारीकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. मात्र पालिका प्रशासनाकडून पाणी बिलं पाठवून वसूल केले जाते. महापालिकेचे पाणी मिळत नसल्याने टँकरच्या पाण्यावरच त्यांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे दरमहा टँकरवर ५० हजार रूपये खर्च होत आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांना पाणी समस्या सांगितली जाते. प्रत्येकाकडून मुबलक पाणी दिले जाईल, असे आश्वासनही दिले जाते. अनेक वर्षापासून केवळ आश्वासनच मिळत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोसायटीतील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘आधी पाणी द्या, नंतर मतं मागा’, असा फलकच सासोयटीच्या प्रवेशद्वारावर लावून राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मते मागायला येऊ नका, असा स्पष्ट इशाराच दिला आहे. महापालिकेच्या लाईनमध्ये पाणी येत नसूनसुद्धा मार्च २०१९ पर्यंतचे पाण्याचे बिल भरले आहे. जर मत देऊन सुद्धा आमचे पाणी प्रश्न सुटत नाही तर आम्ही मतदान का आणि कशासाठी करावे? असा सवालही सोसायटीच्या फलकात करण्यात आला आहे. देसले पाडा परिसर हा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येतो. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण ग्रामीण परिसरात पाणी प्रश्न पेटणार असल्याचेच दिसून येतय.

First Published on: September 30, 2019 5:57 PM
Exit mobile version