प्रचारात बिर्याणी विक्रेत्यांना अच्छे दिन

प्रचारात बिर्याणी विक्रेत्यांना अच्छे दिन

बिर्याणी

निरनिराळे राजकीय पक्ष मतदारांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवतात. आम्ही तुमचं भलं करू हाच एक प्रचाराचा मुद्दा असतो आणि त्याआधारेच ते मते मागत असतात. आपल्या अच्छे दिन आले आहेत का किंवा येतील का, याबाबत नागरिकांची मतांतरे असतीलही. परंतु, प्रचाराच्या रणधुमाळीत अनेकांना अच्छे दिन येतात. त्यापैकीच एक म्हणजे बिर्याणी विक्रेते. हो ! बिर्याणी बनवर्‍यांना अच्छे दिन आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबईमध्ये नेहमीच बिर्याणीला मागणी असते. मात्र आता मुंबईत याची मागणी अधिक वाढल्याचे पहायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत प्रत्येक उमेदवार जोरदार प्रचारला लागला आहे.

सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्येक उमेदवार प्रचार करत आहे. त्यावेळी या उमेदवारासोबत त्याचे कार्यकर्ते आणि इतर माणसे देखील प्रचार करत असतात. त्यामुळे या प्रचार करणार्‍या माणसांच्या दुपारच्या जेवणाची सोय, सकाळची न्याहारी तसेच संध्याकाळचा नाश्ता याची व्यवस्था केली जाते. सकाळी पोहे, उपमा आणि चहा तर दुपारी जेवणात बिर्याणी किंवा पुलाव असा मेनू ठरलेला असतो. मात्र, सध्या मुंबईत दुपारच्या जेवणात बरेच उमेदवारी बिर्याणी जेवणासाठी ठेवतात. त्यामुळे सध्या बिर्याणी विक्रेत्यांना अच्छे दिन आल्याचे पहायला मिळते.

…म्हणून बिर्याणीची मागणी वाढली

जर पूर्ण जेवण ठेवले तर त्यासाठी मेहनत खूप असून, इतर व्यवस्थाही करणे कठीण होते. मात्र बिर्याणीचा एक एक बॉक्स प्रत्येकाच्या हातात दिला की इतर मेहनतही वाचते आणि प्रचारला येणार्‍या माणसांना खाताना देखील सोयीस्कर होते असे काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच जर पूर्ण जेवण ठेवले तर वरणासाठी वेगळा टोप, भाजीसाठी वेगळा टोप, भातासाठी वेगळा टोप तसेच पोळ्यांसाठी वेगळे भांडे एवढी व्यवस्था करावी लागते. तसेच एवढा वेळ तरी कुठे असतो त्यामुळे बिर्याणी सोयीस्कर ठरते असे काहींनी खासगीत बोलताना सांगितले.

मी बिर्याणी बनवण्याच्या मोठमोठ्या ऑर्डर स्वीकारतो. सध्या निवडणुका असल्याने अनेकांकडून व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीच्या ऑर्डर येतात. जसाजसा प्रचाराचा जोर वाढेल तशी मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.– राजू बिर्याणीवाला

First Published on: April 13, 2019 4:05 AM
Exit mobile version