टेली मानस हेल्पलाईन लागली खणखणू

टेली मानस हेल्पलाईन लागली खणखणू

मानसिक आजाराबाबत अद्यापही कोणी उघडउघड बोलत नसल्याने या आजाराच्या रुग्णसंख्येत कळत नकळत वाढ होताना दिसते. प्रामुख्याने कोरोनानंतर या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातच अत्याधुनिक तंत्रणांचा वापर करीत केंद्र शासनाने राज्यात सुरू केलेल्या टेली मानस या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २४ तास सुरू असलेला हेल्पलाईन नंबर सध्या चांगलाच खणखणत आहे. गेल्या दीड महिन्यात या हेल्पलाईनवर तब्बल ९०४ कॉल्स आले असून हे कॉल्स राज्यभरातील आहेत.

यामध्ये प्रामुख्याने ठाणे- मुंबईपेक्षा पुण्यातून अधिक कॉल्स असल्याचे दिसत आहे. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर समाधानाने फोन खाली ठेवत असल्याचे दिसते. मानसिक आजाराने त्रस्त असणार्‍यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६० ते ७० टक्के इतके असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढेच नाही तर झोप येत नसेल, निराश वाटत असणार्‍यांनी १४४१६ या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर फोन करण्याचे आवाहन ठाणे मेंटल रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक सकारात्मक पाऊल टाकत अत्याधुनिक यंत्रणेची मदत घेत टेली मानस हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ठाणे, पुणे, बीडमधील अंबेजोगाई आणि नागपूर येथे उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये ठाणे आणि पुणे येथे प्राधान्याने हा उपक्रम हाती घेतला गेला असून त्यातील ठाण्यात हा उपक्रम दीड महिन्यापूर्वी ठाणे मध्यवर्ती मनोरुग्णालयात सुरू झाला आहे. या कॉल सेंटरसाठी तातडीने रुग्णालय प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवून मानसतज्ज्ञ डॉक्टर, नर्स, ऑपरेटर आदींची भरती केल्याने मानसिक आजारावरील राज्यातील पहिलीच हेल्पलाईन ठाण्यात सुरू झाली आहे. येथे भरती झालेल्या मंडळींनी राष्ट्रीय स्तरावर परिपूर्ण प्रशिक्षण घेतले आहे. दिवसाला सरासरी २० ते २५ कॉल्स या हेल्पलाईनवर येत आहेत. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयांमार्फत जनजागृती केली जात आहे, पण हवी तशी जनजागृती अजून झाली नसल्याचे बोलले जात आहे.

२० मिनिटांचा एक कॉल
हेल्पलाईनवर एका कॉलसाठी २० मिनिटांचा कालावधी ठरवून दिला असून त्यानंतर तो कॉल कट होतो. त्यामुळे पुन्हा कॉल करता येतो किंवा हेल्पलाईनवरही येतो. यामध्ये संबंधित कॉल धारकाचे सर्व म्हणणे ऐकून त्याचे समुपदेशन केले जाते.

शहरी भागातील कॉलचे प्रमाण ६० टक्के
आतापर्यंत आलेल्या कॉल्सपैकी ४० टक्के कॉल ग्रामीण, तर ६० टक्के शहरी भागातील असल्याचे समोर आले आहे.

५ टक्के प्रमाण न बोलणार्‍यांचे
काही जण हेल्पलाईनवर कॉल करण्याची हिंमत करतात, मात्र हेल्पलाईन सेंटरवरून हॅलो म्हटल्यावर काहीही न बोलता काही क्षणात तो कॉल कट करतात. असे दिवसभरात दोन ते तीन कॉल असून त्याचे प्रमाण साधारणपणे ५ टक्के असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१ टक्का प्रमाण इतर आजारांच्या चौकशीचे
या हेल्पलाईनवर आजारांबाबत वयोवृद्धांच्या नातेवाईकांकडून चौकशी केली जाते. यामध्ये विसरभोळेपणावर काय उपचार आहेत किंवा इतर एखाद्या आजाराबाबत चौकशी केली जाते. असे प्रमाण अवघा १ टक्का आहे.

तरुणाई जास्त त्रस्त
कोरोनामुळे तसेच कौटुंबिक वाद, झोप येत नाही, विविध चिंताग्रस्त असे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तरुण सापडले असून त्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके आहे. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. या हेल्पलाईनचा ठाणे-मुंबईपेक्षा पुणेकर मंडळी जास्त वापर करीत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

काय आहे टेली मानस?
मानसिक आजारांवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने टेली मानस हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून त्यावर संपर्क साधल्यास शंकांचे निरसन होते.

साधा १४४१६ वर संपर्क
कुटुंबातील किंवा तुम्ही मानसिक आजाराने त्रस्त असाल, ताणतणावात असाल, तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी १४४१६ या क्रमांकावर संपर्क साधल्यास सल्ला मिळेल.

या मानसिक समस्यांवर समुपदेशन
झोप येत नाही, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात, घाबरल्यासारखे वाटते, त्यातूनच अंगाला घाम येतो, भास होतो, कशातच मन लागत नाही, अशा मानसिक आजारांनी त्रस्त व्यक्तींनी संपर्क साधल्यास मार्गदर्शन मिळते.

हा केंद्राचा उपक्रम असून तो ३ वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. राज्यात ठाणे, पुणे, बीड, नागपूर अशा ठिकाणी टेली मानस हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. ठाण्यात हेल्पलाईन सुरू झाली आहे. सुरुवातील ऑडिओद्वारे सल्ला दिला जाणार असून कालांतराने तो व्हिडीओद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध होईल. उपचाराची गरज असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. या हेल्पलाईनवर संपर्क करणार्‍या व्यक्तीची माहिती कुठेही उघड केली जात नाही. त्यामुळे मानसिक ताणतणावाने त्रस्त असणार्‍यांनी टेली मानस १४४१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
– डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे मेंटल हॉस्पिटल

First Published on: November 26, 2022 2:39 AM
Exit mobile version