जेसीबीने दुकान उध्वस्त करणाऱ्या ‘त्याला’ अखेर अटक

जेसीबीने दुकान उध्वस्त करणाऱ्या ‘त्याला’ अखेर अटक

एका गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्याला दुकान विकत दिले नाही म्हणून त्याने रागाच्या भरात फर्निचर मार्केट मधील दुकानात रात्रीच्या सुमारास जेसीबी मशीन लावून लाखो रुपयांचे फर्निचर काही दिवसांपूर्वी उध्वस्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अखेर एक आठवड्यानंतर आरोपी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे .

उल्हासनगर – 3 येथील फर्निचर मार्केट परिसरात नरेश चंदर खटवानी ( 35 ) या व्यापाऱ्याचे न्यू राज फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या मागे त्याचे गोडाऊन असून त्यात फर्निचर आणि फर्निचरचे साहित्य ठेवले होते. नरेशच्या प्रॉपर्टीवर  मनोज साधवानी नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्याचा डोळा होता. त्याने नरेशकडे दुकान विकत घेण्याची ऑफर दिली होती. मात्र नरेशने दुकान विकण्यास नकार दिला होता. या गोष्टीचा मनोजला राग आला आणि त्याने 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास नरेशच्या दुकानात बुलडोजर लावून लाखो रुपयांचे फर्निचर आणि फर्निचरच्या साहित्यांची तोडफोड केली.

या प्रकरणी नरेश खटवानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तर आरोपी मनोजकडे जागेचे कागदपत्रे असून त्याने प्रांत कार्यालय मार्फत कारवाईची मागणी केल्याचे लेखी कागदपत्रे  दाखवून पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राजेंद्र कोते यांनी या प्रकरणात तपास सुरू केला होता .

आज तब्बल एक आठवड्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी मनोज साधवानी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत त्याने नरेशच्या 20 लाख रुपयांचे फर्निचर आणि फर्निचरचे साहित्य जप्त केले असल्याचे नमूद केले आहे.

First Published on: April 21, 2019 5:13 PM
Exit mobile version