फिल्मसिटीचा होणार कायापालट; २ हजार २५० कोटींचा खर्च करण्याचा सरकारचा हेतू

फिल्मसिटीचा होणार कायापालट; २ हजार २५० कोटींचा खर्च करण्याचा सरकारचा हेतू

फिल्मसिटी

फिल्मसिटी..अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी. मुंबईच्या गोरेगाव भागात असलेल्या या चित्रनगरित अनेक मालिका तसेच सिनेमांचे चित्रीकरण होते. मात्र लवकरच या फिल्मसिटीचा कायापालट होणार असून, यासाठी २ हजार २५० कोटींचा खर्च करण्याचा सरकारचा हेतू आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा(बीओटी) या तत्वावर चित्रनगरीचा विकास करण्यात येणार असून, यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. सध्या रिलायन्स  इंडस्ट्रीज, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि भानोट इन्फ्राव्हेंचर्स या तीन कंपन्यांनी यासाठी पुढाकार दाखवला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ५२१ एकरच्या जागेत असलेल्या या फिल्मसिटीचा कायपालट पाच वर्षांत होणार आहे.

नितीन देसाईंचे डिझाइन

येत्या पाच वर्षात कायापालट होणाऱ्या या फिल्म सिटीचे डिझाइन नितीन देसाई आणि संदीप शिक्रे यांनी केले असून, यामध्ये एक भव्य बॉलिवूड म्युझियम देखील असणार आहे. तसेच १०० वर्षांचा भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास देखील पाहता येणार आहे. एवढंच नाही तर उभारण्यात येणाऱ्या म्युझियममध्ये लंडनच्या माँदाम तुसाँच्या धर्तीवर वँक्स म्युझियम, स्टंट सीनचे थिएटर, चित्रपटसृष्टीच्या विविध विषयांवरचे लेझर शो, साउंड अँड लाईट शो, तसेच पर्यटकांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि समुध्द संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी मराठी संस्कृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी खास सोयी सुविधा

फिल्मसिटी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी खास सोई सुविधा देण्यात येणार असून, परवडणारी हॉटेल्स देखील बांधण्यात येणार आहेत. तसेच बच्चेकंपनीसाठी थीम पार्क देखील उभारण्यात येणार आहे.

सध्या फिल्मसिटीमध्ये ६० पेक्षा अधिक मालिका तसेच चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे. यामध्ये मराठी तसेच हिंदी मालिकांचा समावेश आहे. तसेच सध्या वर्षाला ७० करोड इतके उत्पन्न मिळत असून, फिल्मसिटीचा कायापालट झाल्यानंतर हे उत्पन्न अधिक वाढणार आहे.
– अमरजित मिश्र, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ 
First Published on: June 10, 2019 5:40 AM
Exit mobile version