गोविंदा पथकांकडून हजार रक्ताच्या बाटलाची कडक सलामी! 

गोविंदा पथकांकडून हजार रक्ताच्या बाटलाची कडक सलामी! 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिंदडी उत्सव साजरा करणे शक्य नसल्याने दहिहंडी समन्वय समितीने शहरातील गोविंदा पथकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत रविवारी मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून तब्बल एक हजारपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करत अनोखी सलामी दिली. यामध्ये गोविंदांसह गोपिकाही मोठ्या हिरहिरीने सहभागी झाल्या होत्या.

हजारपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन  

राज्यामध्ये कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषद व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळे अनेक उत्सवांवर संक्रात आली आहे. परंतु दरवर्षी अनेक संकटाचा सामना करत दहिहंडी साजरा करणार्‍या गोविंदा पथकाने यंदाही कोरोनाच्या संकटाचा सामना धाडसाने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रक्त आटेपर्यंत दहिहंडीचा सराव करणार्‍या गोविंदा पथकांनी यंदा रक्तदान करावे असा निर्णय दहिहंडी समन्वय समितीकडून घेण्यात आला. समन्वय समितीच्या या निर्णयाला गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईमध्ये रविवारी विविध ठिकाणी गोविंदा पथकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून हजारपेक्षा अधिक रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मुंबईतील वडाळा येथील यश गोविंदा पथकाने २०० बाटल्यांचे रक्तसंकलन केले. तर विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि पार्लेश्वर दहिहंडी पथक यांनी एकत्रित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८० बाटल्या, समस्त चुनाभट्टी गोविंदा पथकाने १११, जोगेश्वरीतील एमएमआरडीए वसाहत गोविंदा पथक ७१, आर्यन्स गोविंदा पथक १०१, साईराम गोविंदा पथक ३०७ रक्त बाटल्यांचे संकलन केले. या मंडळांबरोबरच जोगेश्वरीतील साई शाम मित्र मंडळ, कोकण नगर गोविंदा पथक, अंधेरीतील आंबोली गोविंदा पथक, सांताक्रुझचे सर्वोदय गोविंदा पथक, गिरणगावचा गोविंदा या पथकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गोविंदा पथकांकडून आयोजित रक्तदान शिबिराला शहरातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोरोना काळात चार वेळा भरवली शिबिरे

समाजाप्रती आपली बांधिलकी जपताना यंदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय दहिहंडी समन्वय समितीने घेतला असला तरी समस्त चुनाभट्टी गोविंना पथकाने कोरोना काळात तब्बल चार वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सायन हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर भरवले असून, आतापर्यंत ६७६ रक्त बाटल्यांचे संकलन केल्याची माहिती दहिहंडी समन्वय समितीचे खजिनदार समीर सावंत यांनी दिली.

गोपिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील विविध ठिकाणांहून गोविंदांनी येऊन रक्तदान केले असले तरी यामध्ये गोपिकांही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. पार्ले स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात गोपिंकाचा सहभाग अधिक होता. यातील सात ते आठ गोपिका प्लाझ्मा दान करण्यासाठीही तयार झाल्या. तसेच यावेळी रक्तदानासाठी आलेल्या गोविंदा व गोपिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती दहिहंडी समन्वय समिती सचिव आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष गीता झगडे यांनी दिली.

First Published on: August 9, 2020 8:25 PM
Exit mobile version