धान्य तर मिळते पण शिजवायला इंधन नाही

धान्य तर मिळते पण शिजवायला इंधन नाही

धान्य तर मिळाले पण ते शिजवायचे कसे, घरातील गॅस संपला आहे, स्टोव्हमध्ये रॉकेल नाही, घराचे भाडे थकले, वीज बिल, पाणी बिल कुठून भरणार अशा अनेक प्रकारच्या समस्या लॉकडाऊन काळात शेकडो अंध कुटुंबांसमोर आहेत.

उपनगरीय लोकल ट्रेनवर अवलंबून असणारी शेकडो अंध कुटुंबे वांगणी, बदलापूर, आंबिवली, टिटवाळा, पश्चिम मार्गावरील नालासोपारा, मालवणी या परिसरात राहत आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना पोसणारी उपनगरीय लोकल ट्रेन वाहतूक तीन महिन्यांपासून बंद आहे. ट्रेनमधील प्रवाशांना कटलरी वस्तू, लहान मुलांची खेळणी, उदबत्त्या विकून तसेच गाणी गावून भीक मागणार्‍या अंधांची उपजीविका लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद झाली आहे.

मुंबईतील उपनगरीय ट्रेनवर सुमारे दीड हजार अंधांचे कुटुंब अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे आमचे संपूर्ण आयुष्यच ठप्प झाले आहे. अनेक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. या संस्थांकडून अन्नधान्य मिळते. मात्र, ते शिजवायचे कसे हा प्रश्न पडतो, गॅस संपला तो आणण्यासाठी खिशात दमडी नाही, अशा परिस्थितीत आम्ही दृष्टीहीनांनी करायचे काय? मायबाप सरकारने आम्हाला घरगुती रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अंधबांधव संस्थेचे सचिव संभाजी बदर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केली.

आई-वडील गावाकडे राहतात. त्यांची जबाबदारी देखील माझ्यावर आहे. प्रत्येक महिन्याला त्यांना मनिऑर्डर करावी लागते. घराचे भाडे थकले असून मालकाने घरभाड्यासाठी तगादा लावला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरात एक रुपयाची कमाई नाही. कर्ज काढून कसेबसे तीन महिने लोटले. परंतु, आता कर्ज देणारे सावकार देखील आता पैशासाठी हात आखडता घेत आहेत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न भेडसावत आहे. अशी व्यथा अंधबांधव किशोर घडलिंग यांनी मांडली.

महाराष्ट्र राज्यासाठी सध्याच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी काही कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. यातील एक दुर्दैवी बाब म्हणजे यामध्ये आमच्या अंधांसाठी काहीच तरतूद नसल्याचे समोर आले. सध्या आम्हाला संजय गांधी निराधार योजने अंतर्गत काही पैसे मिळतात. परंतु, ते कधीच वेळच्यावेळी मिळत नाहीत. जानेवारीची रक्कम आता या महिन्यात आमच्या खात्यावर जमा झाली आहे. आमची सरकारला इतकीच विनंती आहे की, हा लॉकडाऊन अजून किती दिवस चालेल माहिती नाही. तसेच लोकल देखील कधी सुरू होईल माहिती नाही. त्यामुळे आम्हा अंधबांधवांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करा, असे अंधांची संस्था चालवणारे संस्थेचे अध्यक्ष मनोज कटारिया यांनी सांगितले.

आम्ही सोशल डिस्टन्स कसे पाळावे…
सोशल डिस्टन्स पाळा, एक मीटरचं अंतर राखा असे सांगण्यात येत आहे. परंतु, आम्हाला स्पर्श ज्ञानाशिवाय काहीच जमत नाही. मग आम्ही कसे सोशल डिस्टन्स पाळणार? अशा वातावरणात सध्या ना आम्हाला खायला अन्न मिळत आहे, ना बाहेर पडण्याची परवानगी. त्यामुळे आम्ही आता जगावे कसे हा आमच्यासमोर प्रश्न असल्याचे ट्रेनमध्ये कटलरीच्या वस्तू विकणारे भीमराव पवार यांनी म्हटले आहे. भीमराव पवार हे एक चांगले ढोलकीवादक आहेत. ट्रेनमध्ये कटलरी वस्तू विकून तसेच वाद्यवृंदामध्ये ढोलकी वाजवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

कल्याण येथील आंबिवली येथे काही अंध कुटुंब राहण्यास आहेत. या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे आम्हाला कोरोना झाल्यास आमचे काय होईल, अशी भीती येथील अंध कुटुंबियांना भेडसावत आहे. घराबाहेर पडायची भीती वाटते, कोरोनाच्या भीतीने आम्ही स्वतःला घरातच कोंडून घेतले आहे. थोडीफार अन्नधान्याची मदत होते. तेवढ्यावरच कसेबसे दिवस ढकलत असल्याचे येथील अंध सरोदे यांनी सांगितले.

First Published on: July 8, 2020 8:58 PM
Exit mobile version