रायगडमधील भूजल पातळी घटली

रायगडमधील भूजल पातळी घटली

भूजल पातळी खालावल्याने दुष्काळाची झळ तीव्र बनली आहे.

मागली वर्षी पावसाने लवकर निरोप घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. जलाशयांच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी देखील घटली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील 5 वर्षाच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळीत 0.49 मीटर घट झाली आहे.

मागील वर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली होती. ऑगस्ट महिन्यातच वार्षिक पर्जन्यमानाची पातळी ओलांडली गेली हाती. परंतु त्यानंतर पाऊस थांबला. त्यामुळे जलाशयांमध्ये पाण्याचा साठा पुरेसा झाला नव्हता. परिणामी पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. ही भिती खरी ठरत आहे. सध्या रायगडातील काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता तर भूजलाची पातळी घटली आहे. त्यामुळे पाणीसमस्या गंभीर होणार आहे.

रायगडमध्ये 60 टक्के पाणी पुरवठा विहिर, बोअरवेल यांच्यावर सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांमधून केले जाते. यामुळे भूगर्भात कमी झालेल्या पाणी साठ्याचा परिणाम या जलस्त्रोतांवर होत आहे. भविष्यात ही घट सातत्याने वाढल्यास रायगडमध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने आपल्या अहवालात नोंदवली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरान येथे 4000 ते 4500 मिमी. परंतु या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरीने 0.12 मीटरने घटली आहे. अलिबाग, उरण या तालुक्यांमध्ये खार्‍यापाण्यामुळे भूगर्भातील गोडे पाणी झपाट्याने कमी होत आहे. कुपलिका, विहिरी यांना खारे पाणी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.रायगड जिल्हा हा मुख्यत्वेकरुन बेसाल्ट नावाच्या अग्नीजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. प्रामुख्याने म्हसळा, श्रीवर्धन, तळा, व मुरुड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकाराचा खडक आढळतो. या खडकात काहीप्रमाणात पाणी साचून राहतो. बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे डोंगर माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जात असल्याने विक्रमी पावसाचे पाणी फारसे जमिनीत मुरले जात नाही. त्यामुळे भूगजल पातळी घटली आहे.

सुधागड, पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ भागात काही नमुना विहिरींमध्ये पाण्याच्या पातळीत कमालीची घट झालेली आहे. भविष्याचा विचार करून पाणी जिरवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– डी.बी. ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, रायगड

First Published on: March 14, 2019 4:23 AM
Exit mobile version