ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगारांची Antigen test होणार

ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगारांची Antigen test  होणार

ठाणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीने अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. मोठमोठ्या गृहसंकुलांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगार यांचीही विनामूल्य अँटीजेन टेस्ट करा, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात दाटीवाटीच्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. सातत्याने केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांमुळे आता येथील कोरोनाचे प्रमाण आटोक्यात येत असतानाच गृहसंकुलांमध्ये मात्र कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत बघायला मिळालेल्या या प्रवाहाची पुनरावृत्ती ठाण्यातही होताना दिसत आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर अनेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने घरकाम करणाऱ्या महिला, गवंडी, प्लंबर, सुतार आदी नाका कामगार यांचीही कामे पूर्वीप्रमाणे सुरू झाली. गृहसंकुलांमधील त्यांचा वावर वाढला. त्यामुळे या सर्व घटकांची विनामूल्य अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले आहेत.

अँटी जेन टेस्टमुळे कोरोनाबाधित रुग्णाचा लवकर शोध लागून त्याच्यावर तातडीने उपचार करणे, तसेच त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखणे शक्य होते. त्यामुळे ठाणे महापालिकेने प्रत्येक प्रभागात अँटीजेन टेस्ट सुरू करण्याची मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगार यांचीही टेस्ट करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत.


पनवेलमधील आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी अँटीजन टेस्ट चाचणी सुरू!
First Published on: July 23, 2020 7:08 PM
Exit mobile version