ठाणे महापालिकेचे गुजराती प्रेम बहरले?

ठाणे महापालिकेचे गुजराती प्रेम बहरले?

ठाणे

शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेचे मराठीपेक्षा गुजराती प्रेम चांगलचे बहरल्यांचे दिसून आले आहे. गणेश विसर्जनासाठी भक्तांना आवाहन करणारे बॅनर महापालिकेने चक्क गुजराती भाषेत लावले आहेत. मात्र मराठी भाषेत हे फलक लावण्यात आलेले नसल्याने मराठी मनाचे पित्त खवळले असून, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि मनसे या दोन्ही सेना या विषयावर गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका गुजराती भाषेत बॅनर लावणार नाही. काही संस्थांनी १५ हजार वडापाव वाटप करण्यासाठी मंडप बांधण्याची परवानगी मागितली होती. कदाचित त्यांनी हा फलक लावला असावा, मात्र तरीसुध्दा पालिकेने हे बॅनर लावले आहे का, याची माहिती घेऊन चौकशी करेन.
– मिनाश्री शिंदे, महापौर, ठाणे महापालिका

ठाणे महापालिकेच्यावतीने मुंब्रा रेतीबंदर गणेश घाट येथे गणेश मुर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेने गणेश भक्तांना आवाहन करणारे फलकही लावले आहेत. मात्र हे फलक चक्क गुजराती भाषेत लावण्यात आले आहेत, मराठी भाषेत अशा प्रकारचे आवाहन असणारे एकही फलक लावण्यात आले नसल्याने गणेश विसर्जनासाठी आलेल्या मराठी मनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या फलकावर ठाणे महापालिकेचा सिम्बॉल आहे. ज्याप्रमाणे गुजराती भाषेत हे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेत हे फलक पालिकेने का लावले नाही?, असा सवाल अनेक गणेश भक्तांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे अशी ठाण्याची ओळख समजली जाते. ठाण्यात मराठी टक्का समाज मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा ठाकला. मात्र शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेला मराठीचा विसर कसा पडला?, असाही सवाल एका गणेश भक्ताने उपस्थित केला. तसेच ठाण्यात मनसेलाही मोठा जनाधार आहे. केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गुजराती समाजाचे वर्चस्व वाढत चालले आहे. मुंबईतील मराठी विरूध्द गुजराती संघर्ष वरवर दिसत नसला तरी तो आहेच. आर्थिक नाड्या गुजराती समाजाच्या हातात आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातही सर्वाधिक फटका ठाणे आणि पालघर जिल्हाला बसत आहे. त्यामुळे ठाण्यात गुजराती समाजाचे वर्चस्व वाढत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

First Published on: September 5, 2019 7:39 PM
Exit mobile version