फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला?; सदावर्तेंचा दावा

फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला?; सदावर्तेंचा दावा

मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा कट रचला होता, असा दावा adv गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी केला.

ते म्हणाले, हा कट कुठे रचला गेला हे मला माहिती आहे. शरद पवार यांच्या सिलव्हर ओक बंगल्यावर हल्ला झाल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली. त्यानंतर माझ्या अटकेची श्रृंखला सुरु झाली. ठिकठिकाणी माझ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हा काही नेते व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या होत्या. तिथेच फडणवीस यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला. त्या बैठकीनंतर फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेला. याचे सत्य बाहेर काढायचे असल्यास माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील व अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी adv सदावर्ते यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला नाही, असे बुधवारी माजी मंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना वळसे-पाटील यांच्या तोडून कट असा शब्द निघाला. त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मला अटक झाल्यानंतर चौकशीची दिशा वेगळीच होती. डीसीपी मला वारंवार लॉकअपमधून बाहेर काढत होते. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यापेक्षा मला अन्य प्रश्न अधिक विचारले गेले. फडणवीस यांची भेट, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, डावे याविषयी मला प्रश्न विचारण्यात आले. मी त्यांना वारंवार सांगायचो की तुमचा प्रश्न चुकतो आहे. पण पोलिसांचे प्रश्न काही संपले नाहीत. त्यांना कसेही करुन आम्हाला अडकवायचे होते, असा दावा adv सदावर्ते यांनी केला.

गावदेवी पोलीस ठाण्यात एक हार्डडिस्क आहे. या हार्डडिस्कमध्ये दोन वर्षांचे रेकॉर्डिंग आहे. हे रेकॉर्डििंग तपासा. कोल्हापुरातील फुटेजही तपासा. त्यातून फडणवीस यांच्या अटकेच्या कटाचे सत्य समोर येईल. शरद पवार हेच फडणवीस यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत होते. शरद पवार यांनीच हा कट रचला होता. शरद पवार यांच्याच काळात दाऊद मोठा झाला. दाऊदने अनेक भारतीयांना ठार मारले व देश सोडून पळून गेला. आजारी असतानाही शरद पवार याचे डोके खूप चालते, अशी टीकाही adv सदावर्ते यांनी केली.

First Published on: January 25, 2023 5:19 PM
Exit mobile version