सफाळ्यातून बंदुका जप्त

सफाळ्यातून बंदुका जप्त

सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनावे फोंडा पाडा या भागातून गावठी बनावटीचे तसेच नवीन बनावटीच्या सिंगल बोअर बंदुका, जिवंत काडतुसे इत्यादी मोठ्या प्रमाणातील प्राणघातक अग्निशस्त्र साठा पालघर दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी सकाळी टाकलेल्या धाडीत हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपी चिमा शिड्या बरफ (56, रा. सोनावे फोंडा पाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलिस दल सतर्क असतानाच दहशतवादविरोधी पथकाने सकाळी 08:45 च्या सुमारास सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सोनाणे फोंडापाडा येथील चिमा बरफ यांच्या घराजवळ धाड टाकली. या धाडीमध्ये तीस हजार रुपये किमतीच्या तीन गावठी बनावटीच्या सिंगल बंदुका, 2100 रुपये किंमतीची एकूण 21 जिवंत काडतुसे त्यामध्ये शक्तिमान एक्सप्रेस कंपनीचे लेबल असलेले 18 व स्पेशल एफ के कंपनीचे लेबल असलेले तीन जिवंत काडतुसे सापडली.

तसेच नवीन बंदुका बनवण्यासाठीच्या 7 नळ्या, 84 शिशांचे मोठे वेगवेगळ्या आकाराचे छरे व 100 ग्राम वजनाचे लहान छरे तसेच काडतुसांमध्ये भरण्याचे असे नवीन बंदुका बनवण्यासाठी व खाली काडतुसे भरून पुन्हा जिवंत करण्यासाठीचे साहित्य असा एकूण 35 हजार 445 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघर जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही आरोपीने विनापरवाना बेकायदेशीर प्राणघातक अग्नीशस्त्र बाळगल्याने मुद्देमालासह त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पालघर दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी चंद्रकांत ढाणे, कर्मचारी सुनील देशमुख, प्रकाश कदम, प्रशांत तुरकर, संतोष निकोळे, सचिन पाटील, जगदीश गवारी, सुभाष आव्हाड, तुषार माळी, शुभम ठाकूर, प्रवीण वाघ, तळपाडे, वैशाली कोळेकर, सीमा भोये यांनी केली.

निवडणुकीच्या अनुषंगाने दहशतवादी कारवाया होऊ नयेत यादृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात आमचा जागता पहारा आहे. त्यातच सोनावे भागात खबरदारी म्हणून पाहणी करीत असताना आरोपीच्या घराजवळ शस्त्रसाठा आढळला. प्राथमिक अंदाजात आरोपीने शिकारीसाठी तो वापरला असा अंदाज असून यामागे अन्य कोणी आहे का किंवा घातपाताचा प्रकार आहे का याबाबत तपास सुरू आहे.
-मानसिंग पाटील, पोलीस अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, पालघर

First Published on: October 18, 2019 5:30 AM
Exit mobile version