मुंबईच्या ट्रॅफिकने ‘त्याची’ परीक्षा बुडवली

मुंबईच्या ट्रॅफिकने ‘त्याची’ परीक्षा बुडवली

सागर शिरकर

रेल्वेची नोकरी मिळणार असेल तर कोणाला नको? रेल्वेची नोकरी ही तर आयुष्यातली सुवर्णसंधी. अनेक राज्यातून रेल्वेच्या नोकर भरतीसाठी मुलं मुंबईत येत असतात. असंच एक स्वप्नं घेऊन चिपळूणवरून सागर शिरकर आला. मात्र अंधेरी पुलाच्या दुर्घटनेमध्ये त्याला रेल्वेनंच दगा दिला. मुंबई येथील पवईमधील आय. टी. पार्क येथे रेल्वे भरतीकरिता कोकण रेल्वेच्या ग्रेड ३ च्या ११३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेसाठी सागर मुंबईत आला होता.

काय घडलं नक्की?

सागर शिरकर ४ जुलैच्या सकाळीच मुंबईत दाखल झाला. चर्चगेटवरून थेट अंधेरीला जाण्यासाठी त्यानं ट्रेन पकडली. मात्र अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनं त्याची स्वप्नं सध्या तरी धुळीला मिळाली आहेत. अंधेरी पुलाच्या दुर्घटनेमुळं आजही ट्रेन्स वेळेवर नसल्यामुळं सागर परीक्षेला पोहचूच शकला नाही. तब्बल सव्वा तास ट्रेननं प्रवास करून अंधेरीला रिक्षा पकडूनही रस्त्यावर सुरु असलेलं काम आणि वाहतूक कोंडीमुळं तो परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. त्याची परीक्षा हुकली. सकाळी ९ चा पेपर होता आणि ८.३० ला पोहचणं अपेक्षित होतं. मात्र या सगळ्या गोंधळात सागरला पोहचायला ८.४० झाले, तोपर्यंत गेट बंद करण्यात आले होते. त्याच्यासोबत बऱ्याच परीक्षार्थींना हा त्रास सहन करावा लागला. समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही परीक्षेच्या नियमामुळं त्यांना परिक्षेला बसण्यात यश मिळालं नाही.

याबाबत सागरनं आपलं म्हणणं ‘माय महानगर’जवळ व्यक्त केलं.

“कोणताही विद्यार्थी मुद्दाम उशीर करत नाही. परिस्थितीमुळं आम्ही वेळेवर पोहचू शकलो नाही. मात्र वर्षभर मेहनत करून एखादा परिक्षार्थी अभ्यास करत असेल तर अशावेळी प्रशासनानंदेखील थोडी मुभा द्यायला हवी अशी आम्ही विनंती करत आहोत.”

तर याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला संपर्क साधला असता एल. के. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे यांनी अशी माहिती दिली.

“घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती आम्हाला नाही. त्यामुळं आता यावर आम्ही काहीच सांगू शकत नाही. याची संपूर्ण चौकशी करून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.”

First Published on: July 5, 2018 9:41 PM
Exit mobile version