हीच माणुसकी; पॉझिटिव्ह आईच्या निगेटिव्ह बाळाची जबाबादारी घेतली अंपग दाम्पत्याने

हीच माणुसकी; पॉझिटिव्ह आईच्या निगेटिव्ह बाळाची जबाबादारी घेतली अंपग दाम्पत्याने

या अंपग दाम्पत्याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्हानसागर कॅम्प ३ मधील सम्राट अशोक नगरात तब्बल ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना त्यातील एका महिलेचे दोन महिन्याचे गोंडस बाळ मात्र निगेटिव्ह आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्याला कुणीतरी घेऊन जा. आई पॉझिटिव्ह असल्याने त्याला बाधा होऊ शकते. पण कुणी तयार होत नव्हते. अशा वेळी एका समाजसेवकाने मोबाईलवर त्या बाळाचे स्टेटस ठेवले आणि अपंग असलेल्या दाम्पत्याने त्याची आई स्वगृही येईपर्यंत या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. अपंग दाम्पत्याने दाखवलेली ही मानवतेची हृदयस्पर्शी कहाणी उल्हासनगरात चर्चेचा विषय बनली आहे.

चार दिवसापूर्वी सम्राट अशोक नगरातील ३५ वर्षीय मुस्लिम महिला कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये पाठीवरील गाठीचे ऑपरेशन करण्यासाठी गेली होती. कोरोना चाचणीत ती पॉझिटिव्ह निघाली. हॉस्पिटलने तिला नाट्यमयरित्या शासकीय रुग्णालयात सोडल्याने खळबळ उडाली. या महिलेला उल्हासनगरच्या कोविड रुग्णालयात दाखल करून तिच्या नात्यातील २५ सदस्यांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब कलेक्शन घेण्यात आले होते. त्यात १० जण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दोन महिन्याच्या बाळंतीन महिलेचाही समावेश आहे.

तिचे दोन महिन्याचे बाळ मात्र सुदैवाने निगेटिव्ह आल्याने आईजवळ त्याला ठेवणार कसे? त्याला बाधा होण्याची शक्यता असल्याने त्याला कुणीतरी नेण्याची विनंती डॉक्टरांनी केली. पण या बाळाला नेण्यास कुणी तयार होत नव्हते. अशावेळी येथील समाजसेवक अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी त्यांच्या मोबाईलवर या बाळाचा हृदयाला भिडणारा स्टेटस ठेवला. कुणी या बाळाला त्याची आई स्वगृही येइपर्यंत सांभाळ करणार काय? अशी भावनिक हाक दिली.

शिवाजी रगडे यांच्या स्टेटसची चर्चा सर्वत्र सुरू झाली असतानाच पॉझिटिव्ह महिलेच्या लांबचे नातलग आणि जवळच्याच वडोल गावात राहत असणाऱ्या सुलतान आणि फरजाना या अपंग दाम्पत्याने रगडे यांच्याशी संपर्क साधून या बाळाला सांभाळण्यासाठी घरी आणले. कोरोनाच्या भीतीने नागरिक अश्या वेळी पुढे येत नसताना या अपंग दाम्पत्याने दाखवलेल्या जिगरबाजीला सलाम करण्यात येत आहे.

 

First Published on: May 10, 2020 10:09 PM
Exit mobile version