हनी ट्रॅप लावून आरोपीला केले अटक

हनी ट्रॅप लावून  आरोपीला केले अटक

गेल्या तीन महिन्यांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीला पकडण्यात अंधेरी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. रामर सुरलई पिल्लई असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रामरला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हनी ट्रॅप लावला होता. अखेर तीन महिन्यानंतर तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.

पिल्लई हा मूळचा धारावी रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी तो कामानिमित्त विलेपार्ले रेल्वे स्थानकात आला होता. फोनवरुन तो कोणाशी तरी सरकारी कामासाठी चर्चा करीत असताना तक्रारदार तरुणाने त्याचे संभाषण ऐकले. मुलाला कामाची गरज असल्याने त्याने त्याच्याकडे नोकरीविषयी चर्चा केली. मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याची विनंती करुन त्यांनी त्याला नोकरीसाठी पन्नास हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना त्याने भायखळा येथे बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना रामरने मुलाला रेल्वेत नोकरीचे आमिष दाखविले होते. मात्र त्यासाठी आणखी एक लाख रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले. पैसे देऊनही नोकरी लावत नाही म्हटल्यावर आपली फसवणुक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
सिमकार्ड बदलत होता

या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून रामर पिल्लई हा पोलिसांना गुंगारा देत होता. सतत सिमकार्ड बदलत असल्याने त्याला पकडणे पोलिसांना कठीण जात होते. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या पथकातील भारत चौधरी, पाटील, सारीका जाधव, हिरवे, जगताप, ठाकूर यांनी सोमवारी रामर पिल्लई याला अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकला

रामरला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हनी ट्रॅप लावला होता. त्याच्या अटकेसाठी गेलेल्या रेल्वे पोलिसांना तो धारावी परिसरात सापडला नाही. त्यातच तो सतत सिमकार्ड बदलत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सारीका जाधव या महिला पोलीस शिपायाची मदत घेण्यात आली होती. रामरला मोबाईल क्रमांक मिळताच सारीकाने त्याला संपर्क साधला, त्याच्याशी गोड बोलून त्यांनी त्याला भेटण्यासाठी बोलाविले होते. तिला भेटण्यासाठी तो तयार झाला, सोमवारी तो अंधेरी परिसरात आला असता त्याला या पथकाने शिताफीने अटक केली. चौकशीत त्याने तक्रारदाराच्या मुलाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे अन्य काहींची फसवणुक केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: October 10, 2018 1:54 AM
Exit mobile version