क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग

क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग

क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणीच्या विनयभंगप्रकरणी अमित तटकरे नावाच्या एका महानगरपालिकेच्या कर्मचार्‍याला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत अन्य एका तरुणाचे नाव समोर आले असून त्याचा या घटनेशी संबंध आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

तक्रारदार तरुणी ही मालाड परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. करोनाची लक्षणे दिसून आल्याने तिला मालाड येथील न्यू भूमी पार्क परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्यामुळे तिला एक दिवस तिथे राहून दुसर्‍या दिवशी घरी पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. 15 जूनला याच सेंटरमध्ये अमित तटकरे याने तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार या तरुणीने घरी आल्यानंतर तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी 20 जूनला चारकोप पोलीस ठाण्यात अमितसह अन्य एका तरुणाविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुहा दाखल होताच अमित तटकरे याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अमित हा मनपा कर्मचारी असून एका कॉन्ट्रक्टरच्या माध्यमातून त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दुसर्‍या आरोपीचा आता पोलीस शोध घेत असून त्याचा या गुन्ह्यात सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: June 23, 2020 6:49 AM
Exit mobile version