स्वत:चा संसार मोडला, पण मुलीचा संसार जोडला

स्वत:चा संसार मोडला, पण मुलीचा संसार जोडला

कोणतेही संकट आले तरी आईवडील ते आपल्यावर घेत असतात. परंतु आपल्या मुलाबाळांना त्याची धगही लागू देत नाहीत. असाच प्रकार शनिवारी चेंबूरमधील दरडीत सापडळेल्या लता घशिंग यांच्याबाबत घडला. शनिवारी रात्री घरावर दरड कोसळली, पण हे दु:ख पचवत लता घशिंग यांनी रविवारी आपल्या मुलीचे लग्न ठरल्या वेळेला लावून देत तिचा संसार जोडला.

लता घशिंग यांच्या लहान मुलीचे रविवारी लग्न होते. लग्नासाठी घरामध्ये पाहुणे आले होते. शनिवारी रात्री मुलीला हळद लागत असताना अचानक आभाळ कोसळल्याचा आवाज झाला. काही कळायच्या आताच घरावर मोठ्या प्रमाणात दरडीचा मळबा येऊन पडला आणि इतके वर्ष काडी काडी जोडून उभारलेले घर क्षणार्धात पुठ्ठ्यासारखे कोसळले. मोठी मुलगी, जावई, त्यांचे लहान बाळ दरडीखाली सापडले. मुलीने बाळाला पोटाखाली धरल्याने अनर्थ टळला. मेहंदी काढण्यासाठी काही नातेवाईकही आले होते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांवर मृत्यू पाहण्याची वेळ आली. पावसाच्या जोरामुळे डोंगरावरील माती घरावरून वाहून गेली. घरात चार ते पाच फुटापर्यंत चिखल पसरला आहे. अशा अवस्थेत घरातील सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुलीचे लग्न आजच होते, पण मोडलेला संसार सोडून कसं जाणार म्हणून मुलीला नातेवाईकांसोबत लग्नाला पाठवल्याचे लता घशिंग यांनी सांगितले. सुदैवाने सर्व वाचलो पण आता हे घर कसे उभे राहाणार असा प्रश्नही त्यांना पडला आहे.

पोटमाळ्यावर झोपलो म्हणून वाचलो

चेंबूरमधील अन्य एका घटनेत एक महिला आणि तिची मुले थोडक्यात बचावली. ती म्हणाली, पती आपल्या आईकडे गेल्याने घरामध्ये मी आणि मुलेच होतो. रात्री जोरात पाऊस पडत असल्याने मुलांना भीती वाटायला लागली. त्यामुळे त्यांनी माळ्यावर झोपू असे म्हणू लागले. झोपण्यासाठी माळ्यावर गेलो तितक्यात अचानक मोठा आवाज झाला आणि घराची भिंत कोसळली. घराला सर्वत्र शॉक लागत असल्याने आरडाओरडा करून आजूबाजूच्यांकडे जीव वाचविण्यासाठी मदत मागितली. काही लोकांनी येऊन आम्हाला घराबाहेर काढले. घराचे पूर्ण नुकसान झाले आहे आता जगायचे कसे व रहायचे कसे असा प्रश्न पडला असल्याचे लक्ष्मी जोगळेकर यांनी सांगितले.

First Published on: July 18, 2021 8:34 PM
Exit mobile version