भोपाळचं ह्रदय मुंबईत; १२ वर्षीय मुलावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण

भोपाळचं ह्रदय मुंबईत; १२ वर्षीय मुलावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण

१२ वर्षीय मुलावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण

मुंबईतील एका १२ वर्षीय मुलावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे हृदय भोपाळहून मुंबईत आणण्यात आलं आहे. भोपाळ ते मुंबई ६९३ किलोमीटर एवढं अंतर काही तासांमध्ये पार केल्यानंतर हृदय मुंबईत आणण्यात आलं. त्यामुळे, १२ वर्षाच्या मुलाला नव्यानं जीवनदान मिळालं आहे. मुंबईतील १२ वर्षाच्या मुलाला डायलेटेड कार्डिमायोपॅथी (Dilated Cardiomyopathy) होतं. ज्यामुळे त्याच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे त्याच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. जून, २०१९ पासून तो हृदयाच्या प्रतिक्षेत होता. तो मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.

६२ वर्षाच्‍या महिलेच्या हृदयाचे प्रत्यारोपण

मध्‍यप्रदेशच्या भोपाळमधील एका ६२ वर्षाच्‍या महिलेचा अपघात झाला. त्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ भोपाळमधील स्‍थानिक हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यात आले. पण, उपचारादरम्यान, त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. तिच्या कुटुंबाचं अवयवदानाबाबत समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर तिच्या कुटुंबाने अवयवदानाला परवानगी दिली. त्यांच्या परवानगीनुसार महिलेचं हृदय, यकृत आणि किडनी आणि डोळे दान करण्यात आले. पती आणि मुलांनी त्यांचे अवयवयदानाला परवानगी दिल्यामुळे त्यांचे अवयवदान करण्यात आले आहेत.

फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मुलाला हृदयाची तात्काळ गरज असल्यानं भोपाळहून या ब्रेनडेड महिलेचं हृदय मुंबईला आणण्याचं ठरलं. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजून १२ मिनिटाला हे हृदय पोहोचलं. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हे हृदय सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी पोहोचलं. त्यानुसार, हृदयाने ६९३ किलोमीटर एवढं अंतर पार करत या मुलावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं. डॉ. अन्वय मुळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने २५ जुलैला १२ वर्षीय मुलावर हे हृदय प्रत्यारोपित केलं.

शस्‍त्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील ४८ ते ७२ तासांपर्यंत या मुलांच निरीक्षण केलं जाईल. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भोपाळहून झालेलं हे दुसरं अवयवदान आहे. आतापर्यंत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एकूण १०२ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत.  – डॉ. अन्‍वय मुळे; कार्डियक ट्रान्‍सप्‍लाण्‍ट टीमचे प्रमुख, फोर्टिस हॉस्पिटल


हेही वाचा – सुरतच्या मुलावर झाली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


 

First Published on: July 27, 2019 5:00 AM
Exit mobile version