सुरतच्या मुलावर झाली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

सुरतच्या मुलावर झाली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात एका २६ वर्षीय मुलावर मंगळवारी यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. हे प्रत्यारोपण मुंबईतील या वर्षीचं २० वं यशस्वी हृदय प्रत्यारोपण आहे. तर, फोर्टिस रुग्णालयातील हे ८५ वं हृदय प्रत्यारोपण आहे.

अपघातानंतर अवयव दानाचा निर्णय

सुरतला राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीच्या अवयवदानामुळे २६ वर्षीय तरुणाला नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. सुरतमधील २१ वर्षीय मुलगी रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती. उपचारानंतर काही वेळातच डॉक्टरांनी या मुलीला ब्रेनडेड घोषीत केलं. त्यानंतर या मुलीच्या आईने खूप धाडसाने मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले आहेत.

सहा जणांना मिळाले जीवनदान

सुरत मधीलच एका २६ वर्षाच्या तरुणाला या मुलीचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हे हृदय प्रत्यारोपण मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात करण्यात आले. या मुलीच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले. ज्या मुलावर हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. तो मुलगा सप्टेंबर २०१८ पासून प्रतिक्षा यादीत होता.

अवयवदानाने इतरांसमोर आदर्श ठेवला

सूरत ते मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयाचा २८२ किलोमीटरचा पल्ला अवघा १ तास ४८ मिनिटांमध्ये पार करण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत बोलताना कार्डियाक ट्रान्सप्लांट टीमचे प्रमुख डॉ. अन्वय मुळ्ये म्हणाले की, “या तरूणीच्या आईने अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे त्यांच्याच शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. अवयवदानासारखा महत्त्वाचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श ठेवणाऱ्या कुटुंबीयांचे आम्ही नम्र आहोत.”

First Published on: November 20, 2018 9:55 PM
Exit mobile version