ठाण्यात पावसाचा हाहाकार; विविध भागांमध्ये साचले पाणी

ठाण्यात पावसाचा हाहाकार; विविध भागांमध्ये साचले पाणी

ठाण्यात पावसाचा हाहाकार; विविध भागांमध्ये साचले पाणी

मुसळधार पावसाने ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातही हाहाकार उडाला. ठाणे रेल्वे स्थानकातील रूळ आणि शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कळवा येथील रघकुल सोसायटीत पाणी शिरल्याने २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले. तर श्रीरंग आणि वृंदावन सोसायटी येथेही पूरसदृश्य स्थिती उदभवल्याने महापालिकेने बोटीतून लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच दिवा परिसरातून सुमारे ४ हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

ठाण्यात विविध भागांमध्ये साचले पाणी

ठाण्यात किसन नगर, इंदिरा नगर, भवानी नगर, आनंद पार्क या परिसरातील लोकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले. तसेच नौपाडा, भास्कर कॉलनी, वृंदावन सोसायटी, राबोडी, श्रीरंग सोसायटी, कोपरी परिसर आणि हाजूरी भागातील काही घरात पाणी शिरले. शहरातील ३५ ते ४० ठिकाणी पाणी साचून तळे साचले. घोडबंदर रोडवर ठिकठिकाणी आणि हिरानंदानी इस्टेट या उच्चभ्रू संकुलातील रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. हिरानंदानी संकुलातील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.

४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून होते. तसेच महापालिका मुख्यालयासह, प्रभाग समिती स्तरिय यंत्रणा, आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा कार्यरत आहे. दिवा येथे टीडीआरएफच्या दोन तुकड्या, ६ बोटी उप आयुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता मदत कार्य करीत आहेत. या ठिकाणाहून जवळपास ४ हजार रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून तिथे मदतकार्य सुरूच आहे. तसेच कळवा येथेही टीडीआरएफची एक तुकडी सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, बोटसह संपूर्ण यंत्रणा मदतकार्यात कार्यरत आहे. येथील रघकुल सोसायटीमधील २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. श्रीरंग आणि वृंदावन सोसायटी येथेही महापालिकेने बोट पाठविण्यात आली आहे. नागरिकांना तात्काळ मदत पुरविण्यात येत आहे. मुंब्रा येथील चार घरांचा भाग कोसळल्यामुळे ती घरे खाली करण्यात आली. तर माजिवडा प्रभाग समिती येथील पातलीपाडा येथील धोकादायक स्थितीतील २५ घरे खाली करण्यात आली. येथील लोकांना संक्रमण शिबीरामध्ये स्थलांतरित करण्यात आले. कळवा येथील रघकुल सोसायटीमधील २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले. वर्तकनगरयेथील स्ट्रीट चिल्ड्रन शेल्टर होम येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये स्थलातंरित करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बारवी धरणातून पाणी सोडल्यामुळे उल्हास नदी आणि खाडीच्या पाण्याची पातळी वाढली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.

First Published on: August 4, 2019 8:52 PM
Exit mobile version