विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी हेल्पलाईन

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी हेल्पलाईन

Helpline

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून छात्र भारती विद्यार्थी संघटनेने 7 नोेव्हेबरला मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडता येणार आहेत. हे प्रश्न संघटना तातडीने सोडविणार आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या उपस्थितीत हेल्पलाईनची सुविधा सुरु करण्यात आली. छात्र भारती विद्यार्थी संघटना अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्या, अडचणी छात्र भारती वेळोवेळी सोडवत आली आहे. परंतु सध्याच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना विद्यार्थी संघटनेशी जोडून घेण्यास व आपले प्रश्न सोडवण्यास सहजता यावी, यासाठी छात्र भारतीतर्फेही हेल्पलाईन सुरु केली आहे. कॉलेजमधील प्रवेश, गुणपत्रिका गोंधळ, फ्रीशीप- स्कॉलरशीप प्रश्न, वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या, महाविद्यालय प्रशासनाकडून होणारा त्रास, विद्यापीठातील अडचणी, करीअर मार्गदर्शन, महाविद्यालयीन मुलींचे प्रश्न, रॅगिंग, अभ्यासात येणारे नैराश्य अशा समस्या विद्यार्थ्यांना बिनधास्तपणे हेल्पलाईनवर मांडता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी 8454008006 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी सांगितले.

समुपदेशनासाठी डॉक्टरांची टीम
कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नैराश्य आल्यास छात्रभारतीमार्फत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील नामांकित डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क केल्यास त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लवकरच टोलफ्री नंबर
छात्र भारती विद्यार्थी संघटनेने सुरू केलेली हेल्पलाईन सध्या मुंबईपुरतीच मर्यादित असून, लवकरच ती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रामध्ये विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या मोबाईल क्रमांकाने सुरू केलेल्या हेल्पलाईनसाठी टोल फ्री नंबर घेण्यात येणार आहे.

First Published on: November 8, 2019 1:47 AM
Exit mobile version