मुंबईकरांचा ‘हिमालय’ लवकरच होणार खुला

मुंबईकरांचा ‘हिमालय’ लवकरच होणार खुला

मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्यालय परिसर यांना जोडणाऱ्या ‘हिमालय’पुलाचे काम
जवळपास पूर्ण झाले आहे. कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ दिल्यास त्या दिवशी हा पूल मुंबईकरांसाठी खुला होणार आहे.

हिमालय पुलावरून दररोज हजारो पादचारी ये – जा करीत असतात. मात्र १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असतानाच हिमालय पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये जिवीत हानीही झाली होती. या घटनेने मुंबईकर हादरले तर पालिका प्रशासनही सुन्न झाले होते. या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांची तपासणी करण्यात आली.

हिमालय पुलाचे संपूर्णपणे पाडकाम करून पुलाची नव्याने उभारणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. नवीन पुलासाटी कंत्राटदार नेमणुकीवरून झालेला वाद, प्रकरण न्यायालयात जाणे, पावसाळा आदी कारणांमुळे पुलाचे काम मध्यंतरी रखडले होते.

मात्र त्यानंतर पुलाच्या कामाला वेग देण्यात आला. गेल्या काही दिवसांत पुलाचे मुख्य स्तंभ उभारणी, सदर पुलासाठी गर्डर चढविणे, पुलाचे लादीकरण, संरक्षणासाठी ग्रील बसविणे, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जिना उभारणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. आता या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिमालय पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर पुलाला जोडून सरकता जीना बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. सरकत्या जिन्यामुळे गर्भवती महिला व वयस्कर व्यक्ती आदींना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच लोकार्पण
हिमालय पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. मात्र काम पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल. त्यामुळे कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा पूल लोकांसाठी खुला होईल, अशी माहिती महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौदन्यपूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

First Published on: March 15, 2023 8:01 PM
Exit mobile version