शैक्षणिक दिनदर्शिकेमधून ‘हिंदी’ विषय गायब

शैक्षणिक दिनदर्शिकेमधून ‘हिंदी’ विषय गायब

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व पालकांच्या मदतीने कसे स्वयंअध्ययन करावे याबाबत माहिती दिली आहे. मात्रया दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा असलेल्या ‘हिंदी’ विषयाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. शिक्षण क्षेत्रही यातून वगळले नाही. सध्या ऑनलाईन शिक्षण दिले जात असले तरी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देता यावे, यासाठी पालकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन व मार्गदर्शनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विषयनिहाय शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षक आणि पालकांनी जून ते ऑगस्टदरम्यान विषयनिहाय कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा याचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. ही दिनदर्शिका परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र या दिनदर्शिकेत हिंदी विषयच समाविष्ट केला नसल्याचे उघडकीस आले आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी देशात सर्वाधिक बोलली व लिहिली जाणार्‍या, व्यवहारातील महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रभाषा हिंदीला स्थानच देण्यात आले नाही. दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट न केल्याने हिंदी शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या संदर्भात मेसेज व्हायरल होत आहेत. हिंदी अध्यापक ग्रुप, हिंदी अध्यापक महाराष्ट्र, हिंदी शिक्षक या सारख्या अनेक हिंदी विषय शिकणार्‍या शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

काय आहे दिनदर्शिकेत
पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन, अभ्यास व मुल्यमापन यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्माण केलेले हे पुरक साहित्य विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांनाच लॉकडाउनच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी पीडीफ स्वरूपात असलेल्या या दिनदर्शिकेत गणिते कोणत्या पध्दतीने सोडवायची, उजळणी कशी करायची, पाठ वाचन झाल्यावर कृती पत्रिका सोडवण्यासाठी काय करायचे? या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

देशात सर्वाधिक बोलली आणि लिहिली जाणार्‍या हिंदी भाषेच्या विषयाला शैक्षणिक दिनदर्शिकेत स्थान न देणे हे फारच खेदजनक आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तातडीने शैक्षणिक दिनदर्शिकेची पुर्नरचना करावी.
– उदय नरे, माजी सदस्य, राज्य मंडळ

First Published on: June 23, 2020 7:24 PM
Exit mobile version