एचआयव्ही संक्रमित मुले बनणार ‘रोल मॉडेल’

एचआयव्ही संक्रमित मुले बनणार ‘रोल मॉडेल’

आई-वडिलांकडून जन्मजातच एचआयव्हीची लागण झालेल्या अनेक मुलांना किशोरवस्थेत एचआयव्हीग्रस्त असल्याचे समजते. अशावेळी अनेक विद्यार्थी मानसिक आजाराची शिकार होतात. मानसिक गर्तेत सापडलेल्या अशा मुलांसाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने नवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या आजाराने संक्रमित मुलेच अन्य मुलांना चांगल्या पध्दतीने समजावून सांगू शकतात, त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या मुलांपैकीच हुशार, हरहुन्नरी मुलांची निवड करून त्यांच्या माध्यमातून अन्य मुलांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने करण्याचे ठरवले आहे.

नुकत्याच झालेल्या जागतिक एड्स दिवसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने ‘मितवा’ नावाने एक अभियान सुरु केले आहे. जन्मजात एचआयव्ही संक्रमित असलेल्या किशोरवयीन मुलांसाठी हे अभियान आहे. या अभियानातगर्ंत सध्या युध्दपातळीवर काम सुरू आहे. मुंबईत ९०० पेक्षाही अधिक किशोरवयीन मुले एचआयव्ही संक्रमित आहेत. जागतिक एडस दिवसानिमित्त घेतलेल्या वर्कशॉपच्या माध्यमातून अनेक मुले उपचारासाठी घाबरतात व समाजापासून दूर राहण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे समोर आले. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये आजाराबाबतची भीती, एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. शिवाय भविष्यात या मुलांना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जेणेकरुन, ही मुले समाजात ताठ मानेने जगू शकतील, अशी आशा मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेच्या वरिष्ठ अधिकारी व्यक्त केली.

एचआयव्ही संक्रमित मुलांना समजून घेण्यासाठी व मनातील शंका दूर करण्यासाठी त्यांच्यातीलच हुशार मुलांची निवड केली जाणार आहे. ही मुले अन्य मुलांबरोबर सातत्याने चर्चा करून त्यांच्यातील भीती दूर करणार आहेत. अशा रोल मॉडेल मुलांना संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– डॉ. श्रीकला आचार्य, प्रकल्प संचालिका, मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्था
First Published on: December 31, 2020 7:55 PM
Exit mobile version