जाहिरात होर्डिंगसाठी कळंबोलीत पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग!

जाहिरात होर्डिंगसाठी कळंबोलीत पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग!

सायन – पनवेल महामार्गावरील कळंबोली वसाहतीजवळ जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने चक्क झाडांवर विषप्रयोग केला जात असल्याची तक्रार कळंबोली विकास समितीने केली आहे. हा प्रकार संस्थेचे संस्थापक प्रशांत रणवरे यांनी उघडकीस आणला आहे. गेल्या वर्षभरापासून या परिसरातील वनराई नष्ट करण्याचे सत्र सुरूच आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पनवेल महापालिका, वनविभाग आणि इतर यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत असून वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल सायन महामार्गालगत शिवसेना शाखेसमोर पूर्वी इमारतीच्या कंपाऊंडमध्ये तसेच बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. या झाडांमुळे या परिसरात एक प्रकारे हिरवाई दिसून येत यामुळे आजूबाजूच्या इमारतींना एक प्रकारे ऑक्सिजन मिळत होता. सिमेंटच्या जंगलातही अशा प्रकारे झाडे असल्याने पर्यावरण संतुलनासाठी काही प्रमाणात मदत होत होती. परंतु वर्षभरापूर्वी या ठिकाणी एका खासगी जाहिरात कंपनीने मोठे होर्डिंग उभे केले. इमारतींच्या कंपाऊंडमध्ये लोखंडी पिलर टाकण्यात आले. वास्तविक पाहता वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या परिसरात अशाप्रकारे होर्डिंग्ज उभे करणे धोकादायक आहे. असे असतानाही पनवेल महानगरपालिकेकडून याला परवानगी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे याकरता आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला. अचानक हिरवीगार असलेली झाडे सुकुन गेली. धोकादायक म्हणून महापालिकेने त्यावर कुऱ्हाड मारली. आणि गेल्या काही वर्षांपासून असलेली या ठिकाणची वनसंपदा नाहीशी झाली. यासंदर्भात कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आवाज उठवला. महापालिकेच्या महासभेत सुद्धा प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले.

परंतु यावर विषप्रयोग झालाच नाही अशा प्रकारे महापालिकेकडून दावा करण्यात आला. त्यानंतर शाखेसमोरील काही झाडांवर अशाच प्रकारे रसायन टाकून सुकवण्यात आले. काही दिवसांपूर्वी मॅकडोनाल्ड समोरील काही झाडे रात्रीतून तोडण्यात आली याबाबतही कळंबोली विकास समितीने संबंधितांकडे तक्रार केली. हे प्रकरण ताजे असताना शिवसेना शाखेपासून काही मीटर अंतरावर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला बिळे पाडून त्यामध्ये घातक रसायन टाकण्यात आले.

परिणामी हे झाड वाळण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात प्रशांत रणवरे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिकेला लेखी तक्रार केली आहे. अशाप्रकारे झाडांवर राजरोसपणे विषप्रयोग करून ते नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कट आखला जात आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्याचबरोबर प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्षित मानसिकता समोर येत असल्याची टीका रणवरे यांनी केली आहे.

First Published on: October 30, 2020 7:05 PM
Exit mobile version