२६ जानेवारीला नाईट लाईफ सुरू करणे शक्य होणार नाही

२६ जानेवारीला नाईट लाईफ  सुरू करणे शक्य होणार नाही

येत्या 26 जानेवारीला मुंबईत नाईट लाईफ सुरू करणे शक्य होणार नाही. पोलीस यंत्रणांवर याचा किती ताण येईल याचा आढावा घेतला जाईल, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफ योजनेला खो घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. यानंतर या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. 26 जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल, असे मला वाटत नाही. अखेर हा विषय कॅबिनेटमध्ये येईल. तेथे यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो, यंत्रणा किती वाढवावी लागेल याचा विचार होईल. यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल.

अनिल देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नाईट लाईफबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्रीची दुकाने, हॉटेल सुरू ठेवायची म्हणजे त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर येणार. तसेच नागरी भागात रात्रीच्या वेळी हॉटेल, दुकाने खुली राहिल्यामुळे तेथील रहिवाशांना आवाज, गोंगाटाचा त्रास होणार.

हे माहीत असूनही पोलिसांच्या परवानगीशिवायच नाईट लाईफची घोषणा करण्यात आली का, याची चर्चा सध्या मुंबईत सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुंबईच्या नाईट लाईफची घोषणा केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, जगभरात पाहिलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलियन पाऊंडची आहे. दुकानं, हॉटेल्स आणि थिएटरसोबत बीएसटीच्या बस, ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा यांच्याही उत्पादनात वाढ होणार आहे. आत्ताही मुंबई 24 तास सुरूच राहते. कितीतरी अशी ठिकाणे आहेत जिथे रात्रभर हॉटेल्स सुरू असतात. या इकॉनॉमीला अधिकृत करणे गरजेचे आहे. म्हणजे यांच्या उत्पादनासोबत राज्याकडेही कर येईल. यामुळे रोजगारही तिप्पट होऊ शकतो.

First Published on: January 20, 2020 5:48 AM
Exit mobile version